|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » 16 मंत्र्यांकडून 90 हजार कोटींचा भ्रष्टाचार : धनंजय मुंडे

16 मंत्र्यांकडून 90 हजार कोटींचा भ्रष्टाचार : धनंजय मुंडे 

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ

राज्य शासनातील 16 मंत्र्यांनी सुमारे 90 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून राज्यातील तिजोरीतील या पैशांची या 16 मंत्र्यांनी लूट केली आहे. पारदर्शकतेचा टेंभा मिरविणाऱया मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी करावी, अशी जाहीर मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी करुन राज्यातील आणि केंद्रातील भाजपाचे दळभद्री सरकार उलटवून टाकण्यासाठी जनतेने आता सज्ज राहावे असे आवाहनही केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नागज येथे शेतकरी मेळाव्यात आणि आ. सुमनताई पाटील यांच्या फंडातून विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी धनंजय मुंडे बोलत होते.

16 मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे आपण मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. या मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीतून सुमारे 90 हजार कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे. अनेकवेळा मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचे पुरावे दिले आहेत. मात्र या मंत्र्यांवर कारवाई करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांमध्ये नाही. केवळ पारदर्शकपणाचा टेंभा मिरविण्यात मुख्यमंत्री धन्यता मानतात. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी या 16 मंत्र्यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस सरकार केवळ बोलघेवडे आणि आश्वासन बहाद्दर आहे. या सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पुरे केले नाहीत. मराठा आरक्षणाबाबत हे सरकार राजकारण करीत आहे. आघाडी शासनाच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. राणे समितीची स्थापना झाली होती. आमच्या सरकारचीच आरक्षणाबाबतची फडणवीसांनी ‘री ओढली’ आहे. सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. विरोधी पक्ष त्यांना मदत करेल असे सांगून मुंडे म्हणाले, कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे गाजर भाजपाने दाखवले होते मात्र 250 कॅबिनेटच्या बैठका झाल्या. परंतु आरक्षणाचे नाव नाही. केवळ धनगर समाजाला फसवण्याचा उद्योग हे सरकार करीत आहे.

शेतकऱयांच्या कर्जमाफीबाबतही शेतकऱयांची राज्यसरकारने मोठी फसवणूक केली आहे. पती-पत्नीला रांगेत उभे करुन कर्जमाफीचा केवळ फार्स केला आहे. अद्याप शेतकऱयांना म्हणावी तशी कर्जमाफी झाली नाही. शेतकऱयांचे जीवन उद्ध्वस्त करण्यात फडणवीस सरकार आनंद मानते. शेतकरी हा जगाचा पोशींदा आहे. पण स्वतः फडणवीस म्हणतात मीही पाच पिढय़ांचा शेतकरी आहे. येत्या दोन दिवसात शरद पवारसाहेब यांच्या परवानगीने वर्षा बंगल्यावर एक गाय घेऊन जाणार आहे. त्या गायीचे दूध काढण्याची तसदी मुख्यमंत्र्यांना घ्यायला लावेन अशी मिश्कील टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली.

राज्यात दुष्काळाने भीषण रुप धारण केले असताना, हे दळभद्री सरकार दुष्काळ निवारण्याच्या कामात सरकार चालढकल करीत आहे. पिण्याचे पाणी आणि जनावऱयांच्या चाऱयासाठी कोणतीही उपाययोजना सरकारने केली नाही. आघाडी सरकारने दुष्काळाला सामोरे जाताना गाव हा निकष मानला होता. मात्र भाजपाच्या शासनाने तालुका निकष मानून दुष्काळाची व्याख्याच बदलली आहे. पण, सर्वच दुष्काळ ग्रस्तांना शासनाने मदत करण्याची गरज आहे, अशी मागणीही मुंडे यांनी केली.