|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बसस्थानकांत चोऱया करणारी अहमदनगरची टोळी जेरबंद

बसस्थानकांत चोऱया करणारी अहमदनगरची टोळी जेरबंद 

प्रतिनिधी/ चिपळूण

बसस्थानकांमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना लुटणाऱया अहमदनगरच्या सहाजणांच्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. ही कारवाई शनिवारी सायंकाळी 4 वाजता खेड-भरणे परिसरात करण्यात आली. त्यामुळे जिल्हय़ातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता असून सध्या हे चोरटे येथील पोलिसांच्या ताब्यात आहेत.

सोमनाथ ज्ञानदेव गायकवाड (38), ज्ञानदेव प्रभाकर बडे (38), गणेश उर्फ संदीप दिनकर झिझुर्डे (26), आजिनाथ भगवान पवार (32), नागेश बारकू पवार (26), जगन्नाथ मुरलीधर वाघ (50, सर्व पाथर्डी-अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गेल्या काही वर्षांपासून जिल्हय़ातील बहुतेक बसस्थानकांमध्ये सणांच्या वेळी प्रवाशांची होणारी गर्दा लक्ष्य करून चोऱया करण्याचे प्रमाण वाढले आहे. यातील काही चोऱया उघड करण्यात यश आले असले तरी बऱयाच चोऱया उघड झालेल्या नाहीत.

त्यामुळे चोऱया झालेल्या वेळेच्या तांत्रिक बाबी लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा गेले काही महिने तपास करीत होती. त्यानुसार वरील चोरटय़ांचा माग काढला जात होता. अखेर त्यांना शनिवारी अटक करण्यात यश आले. त्यांनी रत्नागिरी, दापोली व चिपळुणातील चोऱयांची कबुली दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अनेक चोऱया उघड होण्याची शक्यता आहे.

चिपळुणात पोलीस कोठडी

या शाखेने या टोळीला अटक करून येथील पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानुसार त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. सध्या हे. कॉ. विनोद आंबेरकर हे 28 ऑक्टोबर रोजी गुहागर-तनाळी येथील वामन पावसकर याच्या 20 ग्रॅम वजनाच्या बसस्थानकातून चोरीला गेलेल्या चेनचा तपास या टोळीकडे करीत आहेत, तर सप्टेंबर महिन्यात टेरव येथील वसंत जाधव यांचीही 2 तोळे वजनाची चेन चोरीला गेली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच झालेल्या या दोन चोऱया उघड होण्याची शक्यता आहे..