|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हजारो कोटी रुपयांची लूट करण्यासाठीच बेळगावात अधिवेशन

हजारो कोटी रुपयांची लूट करण्यासाठीच बेळगावात अधिवेशन 

विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांचा गंभीर आरोप

बेळगाव / प्रतिनिधी

सीमाभागावर आपला हक्क सांगण्यासाठीच बेळगावात कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करून सुवर्णसौध बांधण्यात आले आहे. तर वर्षातून एकदा भरविण्यात येत असणाऱया हिवाळी अधिवेशनासाठीही जनतेचे कोटय़वधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. यावर आजपर्यंत सर्वसामान्य जनताच आरोप करत होती. मात्र विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील – यत्नाळ यांनी हजारो कोटींची लूट करण्यासाठीच बेळगावात अधिवेशन भरविण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे सरकारला घरचा अहेर मिळाला आहे. विजापूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

कोटय़वधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सुवर्णसौधचा वापर सरकारच्यावतीने वर्षभर होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर कर्नाटकाच्या विकासाची घोषणा करून तसेच या भागातील योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चाही अधिवेशन काळात गंभीरपणे करण्यात येत नाही. यामुळे नागरिकांकडून कर स्वरूपात घेण्यात आलेल्या कोटय़वधी रुपयातून बांधण्यात आलेल्या या सुवर्णसौधमध्ये हिवाळी अधिवेशन घेण्यात सरकारचा कोणता उद्देश आहे. असा प्रश्न आमदार पाटील यांनी केला आहे. सुवर्णसौध बांधण्याऐवजी गोरगरीबांना घरे बांधून दिली असली तरी सार्थक झाले असते असे त्यांनी यावेळी सांगितले.

अधिवेशनासाठीही दरवषी कोटय़वधींची उधळपट्टी करण्यात येत आहे. मात्र उत्तर कर्नाटकाबाबत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सावत्रपणाची भूमिका घेत असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर कर्नाटकातील भागात शेतकऱयांची समस्या गंभीर असली तरी मुख्यमंत्र्यांनी या भागास भेट दिली नाही. तसेच बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधची निर्मिती सार्थक होण्यासाठी महिन्यातून एकदा तरी या ठिकाणी मंत्रीमंडळाची बैठक बोलावण्यात यावी, तसेच यामध्ये उत्तर कर्नाटक भागातील गंभीर समस्यांबाबत चर्चा करण्यात यावी. तेव्हाच सुवर्णसौध बांधण्याचा उद्देश साध्य होणार असल्याचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी म्हटले आहे.