|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महामेळाव्यासाठी सीमावासीय सज्ज

महामेळाव्यासाठी सीमावासीय सज्ज 

 प्रतिनिधी/ बेळगाव

सीमाभागातील मराठी बांधवांच्या जखमेवर मीठ चोळून विधानसभेचे अधिवेशन भरविण्याचा घाट एकीकडे कर्नाटक सरकारने घातला आहे. तर दुसरीकडे लोकशाहीच्या मार्गाने लढणाऱया येथील मराठी बांधवांचा घटनात्मक न्याय हक्क डावलण्याचा प्रकार सुरूच आहे. म. ए. समितीतर्फे सोमवार दि. 10 रोजी आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला परवानी देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत मेळावा घेणारच, असा निर्धार म. ए. समितीच्यावतीने करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कोल्हापूचे खासदार धनंजय महाडिक, कागलचे आमदार हसन मुश्रीफ, आमदार धैर्यशील पाटील यांच्यासह महाराष्ट्रातून अनेक नेतेमंडळी सीमावासीयांना बळ देण्यासाठी या महामेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या दौऱयाचा तपशील कर्नाटकाचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांना पाठविला आहे. रविवारी रात्री कोल्हापूर येथे वास्तव्य करुन सोमवारी सकाळी 9.30 वाजता ते कोल्हापूरच्या शासकीय विश्रामधामातून निघणार आहेत. 9.45 वाजता कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे दर्शन घेऊन 10 वाजता तेथून निघणार असून सकाळी 11 वाजता बेळगावच्या सर्किट हाऊसमध्ये पोहोचणार आहेत. तेथून ते व्हॅक्सीनडेपो येथील महामेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

परवानगी देण्यास टाळाटाळ सुरुच

प्रशासनाने अद्याप परवानगी दिली नसली तरी सीमावासियांनी महामेळाव्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. रविवारीही प्रशासनाने मेळाव्याला परवानगी देण्यास टाळाटाळ सुरुच ठेवली. मात्र व्हॅक्सीन डेपो मैदानावर तयारी सुरू करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. परवानगीसाठी मनपा आयुक्त व पोलीस आयुक्त यांची भेट घेण्यात आली. यावेळीही परवानगी देण्यास चालढकल करण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे मराठी भाषिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. परवानगी दिली नाहीतरी आपण महामेळावा घेणारच असा निर्धार समितीच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त  होत आहे.

रात्री उशीरापर्यंत परवानगीसाठीची प्रक्रिया

मेळाव्याला परवानगी घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. डी. सी.राजप्पा यांची भेट घेण्यासाठी वेळ मागण्यात आली होती. मात्र दिवसभर विविध कामांत राजप्पा व्यग्र असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत परवानगीसाठीची प्रक्रिया सुरू होती. यापूर्वी झालेल्या महामेळाव्यांच्यावेळीही एक दिवस शिल्लक असतानाच परवानगी दिली होती. मागील वषी परवानगी नाकारण्यात आली. तसेच महाराष्ट्रातून येणाऱया नेते मंडळींना सीमाभागात प्रवेशबंदी लागू करण्यात आली होती. तरीही सीमावासियांनी आपला मेळावा यशस्वी केला आहे. महाराष्ट्रातील नेते मंडळींनी गनिमीकावा करुन या मेळाव्यास उपस्थिती दर्शविल्यामुळे कर्नाटकी प्रशासनाला काय करावे? हे समजले नव्हते.   

व्हॅक्सीन डेपो मैदानावर महामेळाव्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मैदानावर हजेरी लावली असून या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. परवानगी मिळताच स्टेज उभारणी व इतर कामे सुरू करण्यात येणार आहेत. मेळाव्याला सोमवारी सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील विविध पक्षांची नेतेमंडळी उपस्थित राहून सीमावासियांना मार्गदर्शन करणार आहेत. समितीने केलेल्या आवाहनानुसार  गावोगावांमध्ये मेळावा यशस्वी करण्यासाठी जनजागृतीचे कामही हाती घेण्यात आले आहे. सर्वच स्तरातून मेळाव्यासाठी उदंड प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अधिवेशनाची तारीख जाहीर झाल्यापासून समितीने महामेळावा घेण्याचा निर्धार केला होता. व आठ ते दहा दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्त कार्यालयाकडे  परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे. परंतु महामेळाव्याला महाराष्ट्रातून कोण येणार? आमदार व नगरसेवक उपस्थित राहणार का? असे प्रश्न विचारुन टाळाटाळ केली जात आहे.  मनपाचे अधिकारी नेहमीप्रमाणे पोलिसांकडून परवानगी आणा, असे सांगून वेळ मारुन नेत आहेत. त्यामुळे भेटण्यासाठी गेलेल्या समितीच्या शिष्टमंडळाने परवानगी द्या अथवा न द्या मेळावा होणारच अशी स्पष्ट माहिती अधिकाऱयांना दिली आहे.

 समितीचे सर्व लढे हे लोकशाहीच्या मार्गाने लढले जातात. त्यामुळे परवानगी देणे गरजेचे आहे. परंतु कर्नाटक सरकार प्रत्येकवेळी अरेरावी करत मराठी भाषिकांवर अन्याय करीत आहे. या सर्व प्रकाराला आता जशासतसे उत्तर देणे आवश्यक बनले आहे. यासाठी पूर्णपणे लोकशाही मार्गाने हा मेळावा घेऊन तो यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे.