|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ग्रंथदिंडी ठरली लक्षवेधी

ग्रंथदिंडी ठरली लक्षवेधी 

आण्णाप्पा पाटील/ बहाद्दरवाडी

बेळगुंद येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी यांच्यावतीने रविवार दि. 9 रोजी आयोजित करण्यात आलेल्या तेराव्या मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. लेझीम, टाळ-मृदंगाचा गजर, महापुरुषांच्या वेशभूषेतील बालकलाकार, कलश घेऊन सहभागी झालेल्या मुली व पर्यावरण जागृतीचा संदेश देणारे विद्यार्थी यामुळे ग्रंथदिंडी आकर्षक ठरली.

आकर्षक ग्रंथदिंडीने सुरुवात

सकाळी 9.30 वाजता रवळनाथ देवस्थान येथून गंथदिंडीला सुरुवात झाली. प्रारंभी ग्राम दैवत पुजारी नामदेव गुरव यांच्या हस्ते रवळनाथ मूर्ती पूजन करण्यात आले. विनय कदम यांनी पूजन केले. शिवनेरी प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे अध्यक्ष देवाप्पा शिंदे व अडत व्यापारी अशोक गावडा यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला.

धर्मवीर संभाजी महाराज पुतळय़ाचे पूजन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. गावातून दिंडी फिरत हुतात्मा स्मारक या ठिकाणी आली. तालुका पंचायत सदस्य एन. के. नलवडे एपीएमसी माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाचे पूजन करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

ग्रंथदिंडी संमेलन सभामंडपाजवळ आल्यानंतर सभामंडपाच्या प्रवेशद्वाराचे साहित्यिक कै. पु. ल. देशपांडे प्रवेशद्वाराचे उद्घाटन उद्योजक प्रतिक गुरव यांनी केले. टोप्पाण्णा पाटील यांच्या हस्ते कवी कै. ग. दि. माडगुळकर साहित्य नगरीचे उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्यसेनानी कर्नाटक सिंह गंगाधर देशपांडे सभागृहाचे उद्घाटन ग्राम पंचायत अध्यक्ष शिवाजी बोकडे यांनी केले.

मान्यवरांच्या हस्ते पूजनाचा सोहळा

कै. बी. आर. गामा गुरुजी व्यासपीठाचे उद्घाटन शिवाजी बेटगेरीकर यांनी केले. रवळनाथ प्रतिमा पूजन संजय मोरे, भारतमाता फोटो पूजन दामोदर मोरे, छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पूजन ग्राम पंचायत सदस्य विठ्ठल बागिलगेकर, सरस्वती प्रतिमा पूजन देवेंद्र हुंद्रे, संत ज्ञानेश्वर महाराज फोटो पूजन सी. आर. पाटील, जगद्गुरु संत तुकाराम महाराज फोटो पूजन ऍड. नामदेव मोरे, महात्मा जोतिबा फुले प्रतिमा पूजन मुकुंद हिंडलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रंथदिंडीमध्ये बेळगुंदीसह पंचक्रोशीतील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये बेळगुंदी व सोनोली येथील वारकरी भजनी मंडळांनी विविध भजने सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सोनोली येथील हभप परशराम कणगुकटकर महाराज हे भजनी मंडळ यामध्ये अग्रस्थानी होते.

मान्यवरांकडून दीपप्रज्वलन

माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. वैजनाथ महाजन, शरद पाटील, अभियंता आंद्रु बी. गामा, तालुका पंचायत सदस्या गीता ढेकोळकर, जे. एम. फगरे, माजी उपाध्यक्ष सुभाष हदगल आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

प्रारंभी शहीद जवान, राजकीय क्षेत्रातील दिवंगत नेते मंडळी, दिवंगत साहित्यिक यांना सर्वांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहिली. नरेश दातार यांनी श्रद्धांजलीपर विचार मांडले.

मराठीच्या संवर्धनासाठी संमेलने

सीमाभागावर महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून कथा, लेखन होणे गरजेचे आहे, असे मनोगत प्रा. अजित सगरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष मनोहर मोरे यांनी माय मराठीचे संवर्धन होण्यासाठी साहित्य संमेलनांची गरज आहे. तसेच बेळगुंदी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्याचा जागर या परिसरात होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 उपस्थितांचे स्वागत

आमदार आदर्श प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थिनींनी सत्य शिवाहून सुंदर हे ईशस्तवन म्हटले. बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनींनी ज्ञान मंडपी आज आपुल्या स्वागता करू या स्वागत हे स्वागत गीत सुमधूर आवाजात सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.

प्रा. कोत्तापल्ले यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन अकादमीचे अध्यक्ष प्रकाश किणेकर यांनी स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरील साहित्यिक व मान्यवर मंडळींचे स्वागत संमेलनाचे अध्यक्ष प्रा. कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, प्रा. सी. एन. मुगुटकर, विलासराव पावशे, अनिल कदम, संतोष सुतार, सतीश मोरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. ग्रंथदिंडीत बालवीर विद्यानिकेतनच्या मुला-मुलींनी हलगीच्या तालावर लेझीम सादर केली. एकापेक्षा एक असे लेझीम कलेतील प्रकार सादर करून त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.