|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सीमावासियांच्या जिद्दीची दखल घ्यावीच लागेल!

सीमावासियांच्या जिद्दीची दखल घ्यावीच लागेल! 

बेळगुंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कोत्तापल्ले यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ बेळगाव

मराठी साहित्य व संत संस्कृतीला हजारो वर्षांचा बंडाचा इतिहास आहे. संतश्रे÷ांनी जेव्हा जेव्हा बंडाची परंपरा सुरू केली त्यावेळी प्रखर विरोध झाला. त्याचप्रमाणे मराठी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी सीमाभागात होणाऱया प्रयत्नांना खीळ घालण्याचा प्रकार घडतो आहे. मात्र, राज्यकर्त्यांना या लढय़ाची आणि जिद्दीची दखल घेऊन शरण यावेच लागेल, असे परखड विचार प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्यावतीने रविवारी बेळगुंदी येथे 13 वे मराठी साहित्य संमेलन पार पडले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ज्ये÷ समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले बोलत होते.

ते पुढे म्हणाले, मराठी साहित्याची परंपरा मोठी आहे. साहित्य हे माणसाला जगायला शिकवते, सुसंस्कृत बनविते, धैर्य आणि विचारांची ताकद देते. संतांनी बंडाच्या माध्यमातून निर्माण केलेले साहित्य हे जगण्यातील मर्म सांगते. लोकांना शहाणं करण्याचे कार्य साहित्य करते. यामुळे भाषेचे साहित्य जपले पाहिजे. हे कार्य संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. देशात शेकडो वर्षे अनेक भाषा बोलल्या जातात. मात्र, भाषेची गळचेपी अथवा परस्पर भाषेवर आक्रमण झाल्याचे दिसत नाही. भाषा आणि संस्कृती यापासून दुरावल्याचे दुःख सीमाभागात येऊन अनुभवल्याशिवाय समजत नाही, असे प्रा. कोत्तापल्ले यांनी नमूद केले

भाषिक राजकारणाच्या निमित्ताने सत्तेचे राजकारण सुरू झाले आहे. देशभरात शेती मालाच्या दरासाठी, विकासासाठी, सुधारणेसाठी आंदोलनं होत असतात. मात्र  भाषा, संस्कृती जपण्यासाठी व आपल्या अस्तित्वासाठी सीमाभागातील जनता 60 वर्षांपासून लढते आहे. सीमाभागात मराठी दाबण्यासाठी इतर भाषेचा वापर केला जात आहे. भाषा व धर्म यांचा कोणताच परस्पर संबंध नाही. मात्र, सध्या भाषेचं नातं जात-धर्म, नोकरी, रोजगार याच्याशी जोडलं जात आहे. यामुळे आपली मराठी भाषा टिकविण्यासाठी सीमाभागातील जनता लढते आहे. अनेक वर्षांपासून सुरू असणारा हा लढा राजकीय पातळीवर सोडविण्याची गरज आहे.

भाषा हे अभिव्यक्तीच्या सादरीकरणाचे माध्यम आहे. मात्र, भाषेबद्दल कायम अवहेलना केली तर लोक पेटून आणि कोणत्याही थराला जातात. यामुळे सहनशिलतेचा अंत न पाहता हा प्रश्न सत्तासंघर्ष, हितसंबंध, प्रांत यासाठीच नसून केवळ भाषेच्या अस्तित्वासाठी आहे, याची दखल घेऊन नेत्यांनी यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा. यामुळे सीमावासियांच्या जिद्दीपुढे प्रस्थापित प्रशासनाला झुकावे लागेल,  साहित्यिक म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहे. मात्र, हा प्रश्न आणि भाषिकांचे दु:ख महाराष्ट्रातील जनतेला समजण्यासाठी माध्यम बनण्याचे प्रयत्न नक्कीच करेन, असे मत प्रा. कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.

प्रारंभी अकादमीचे अध्यक्ष प्रकाश किणेकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे शाल व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रा. अजित सगरे यांनी संमेलनाच्या माध्यामातून मराठी भाषेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले.

साहित्य सरिता अंकाचे प्रकाशन

संमेलनाचे अध्यक्ष प्रा. कोत्तापल्ले तसेच ज्ये÷ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन, जि. पं. सदस्य मोहन मोरे, ऍड सुधीर चव्हाण, अनिल कुकडोळकर, आर. एम. चौगुले व इतर मान्यवरांच्या हस्ते साहित्य सरिता अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. साहित्य अकादमीतर्फे संमेलनाच्या कार्याचा आणि कार्यकारिणीची माहिती देणारा अंक प्रकाशित करण्यात आला. यावेळी तरुण भारतचे मुख्य प्रतिनिधी उपेंद्र बाजीकर यांच्या हस्ते तरुण भारत दिवाळी अंक मान्यवरांना देण्यात आला.