|Monday, June 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » काँग्रेसचे पुनरुत्थान आणि भाजपची घसरण

काँग्रेसचे पुनरुत्थान आणि भाजपची घसरण 

हाती आलेले निकाल पाहता मिझोराम व तेलंगण वगळता इतर तीन राज्यात बऱयापैकी जनाधार, जिंकलेल्या उल्लेखनीय जागांच्या स्वरुपात मिळवला आहे. यामुळे या निवडणुकीत ढासळत चाललेल्या काँग्रेसचे राजकीय पुनरुत्थान झाले आहे असे निखालसपणे म्हणावे लागेल. दुसऱया बाजूने भाजपचा राजकीय रथ जो जमिनीपेक्षा बऱयापैकी उंचीवर जवळपास हवेतून मार्गस्थ होता, तो मतदारांनी खाली खेचून पुन्हा जमिनीवर उतरवला आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण व मिझोराम या पाच राज्यांचे निकाल पुढील वर्षात होणाऱया लोकसभा निवडणुकीसाठी दिशादर्शक होते तर दुसऱया बाजूने गत लोकसभा निवडणुकीत पूर्णतः निष्प्रभ होऊन रसातळास पोहोचणाऱया आणि त्यानंतरच्या आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत एकामागोमाग एक राज्यात पराभवास सामोऱया जाणाऱया प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससाठी पक्षाचे राजकीय अस्तित्वच निर्धारित करणाऱया होत्या. हाती आलेले निकाल पाहता मिझोराम व तेलंगण वगळता इतर तीन राज्यात बऱयापैकी जनाधार, जिंकलेल्या उल्लेखनीय जागांच्या स्वरुपात मिळवला आहे. यामुळे या निवडणुकीत ढासळत चाललेल्या काँग्रेसचे राजकीय पुनरुत्थान झाले आहे असे निखालसपणे म्हणावे लागेल. दुसऱया बाजूने भाजपचा राजकीय रथ जो जमिनीपेक्षा बऱयापैकी उंचीवर जवळपास हवेतून मार्गस्थ होता, तो मतदारांनी खाली खेचून पुन्हा जमिनीवर उतरवला आहे. भाषणे, घोषणा, धर्मवाद, राष्ट्रवाद, प्रतिमा, प्रतीके यांची उधळण करण्याऐवजी जमिनीवरील माणसांचे जीवनमान उंचावले जाईल, असे विकासात्मक काही करा असा इशारा मतदारांनी या निकालातून भाजपसाठी दिला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांनी भाजपच्या आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकीतील विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 2004 ते 2009 पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत या तिन्ही राज्यांचा भाजपला देशपातळीवर पडलेल्या एकूण मतात तब्बल एक पंचमांश वाटा होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एकूण 65 जागांपैकी 62 जागा या तिन्ही राज्यांनी भाजपला जिंकून दिल्या होत्या. लोकसभा निवडणुकीचा कल त्याआधी वर्ष-दीड वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुका निश्चितपणे दर्शवितात हे निरीक्षकांचे निरीक्षण खरे मानले तर या तीन राज्यात भाजपला ताज्या निकालातून जो फटका बसला आहे त्याचीच पुनरावृत्ती 2019 च्या लोकसभेतही होऊ
शकते.

       मध्य प्रदेशात अटीतटीची लढत

मध्य प्रदेशसारख्या मोठय़ा राज्यात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्या अटीतटीची लढत झाली आहे. 230 विधानसभा जागांपैकी हा लेख लिहीपर्यंत काँग्रेस 115 जागांवर, भाजप 105 जागा, बसपा 4 जागी आघाडीवर अशी स्थिती होती. याचाच अर्थ गतनिवडणुकीपेक्षा 57 जागा काँग्रेसने मिळविल्या आहेत तर काँग्रेस व इतर पक्षांनी (बसपा) भाजपकडून 60 जागा हिरावून घेतल्या आहेत. गेली जवळपास 13 वर्षे तेथे मुख्यमंत्री असलेले शिवराजसिंह चौहान आणि भाजपची सत्ता यामुळे निर्माण झालेला सत्ताधाऱयांविरुद्ध कल, व्यापम व इतर भ्रष्टाचाराची प्रकरणे, या कृषीप्रधान राज्यातील या क्षेत्रातील दुरवस्था, शेतकऱयांच्या आत्महत्या, अनौपचारिक आर्थिक क्षेत्र बऱयापैकी मोठे असलेल्या राज्यात छोटय़ा व्यापाऱयांना व कामगारांना नोटाबंदीच्या धोरणामुळे बसलेला तीव्र फटका, जीएसटीवर मध्यमस्तरीय व्यापाऱयांची नाराजी, भाजपचे दलित व मुस्लीमविरोधी धोरण, महिलांवरील वाढते अत्याचार यातून निर्माण झालेला एकत्रित नाराजीचा परिणाम मतदानाच्या माध्यमातून तेथे व्यक्त झाला आहे. सध्याचा कल कायम राहिला आणि भाजपबरोबर जाणार नाही असे जाहीर करणाऱया बसपाची साथ काँग्रेसला मिळाली तर मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता बऱयाच काळानंतर येऊ शकते.

राजस्थानात सत्तांतर

 राजस्थानातील अशोक गेहलोत हे वृद्ध व अनुभवी काँग्रेस नेते आणि त्यांच्यासह सचिन पायलट आणि ज्योतीरादित्य सिंधिया या तरुण तुर्कानी कमलनाथ व राहुल गांधी यांच्यासह या निवडणुकीत हा गड भाजपच्या वसुंधराजे यांच्याकडून खेचून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. खरे तर या खेपेस काँग्रेसला एकूण 199 जागांपैकी 130 जागा मिळून मोठे बहुमत मिळेल असा आत्मविश्वास काँग्रेस नेत्यांना होता. परंतु भाजपने सहजासहजी असे होऊ दिले नाही.        या पक्षाने 70 जागांवर आघाडी घेताना आपले आव्हान अजून जिवंत असल्याचे दर्शविले
आहे. बसपाला राज्यात 6 जागांवर आघाडी मिळाली आहे.

  त्यांचा पाठिंबा काँग्रेसला लाभला तर राजस्थानात काँग्रेसची स्थिर सत्ता निश्चितपणे येण्यास कोणतीच अडचण सध्या तरी दिसत नाही. आयपीएल घोटाळय़ातील आरोपी ललित मोदी याला त्याच्या पत्नीवरील उपचारासाठी ब्रिटनबाहेर पडण्यास वसुंधराराजेंची कथित मदत, राजस्थानातील नागरी मूलभूत सुविधांसाठीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष, मीना समाजाची नाराजी, पद्मावत चित्रपटाच्या निमित्ताने स्वयंभू संस्कृती रक्षकांनी तेथे घातलेला धुमाकूळ व त्यामुळे इतर धर्मियात निर्माण झालेली अस्वस्थता या साऱया घटकांचा परिणाम भाजपला भोगावा लागेल असे वाटत होते. निवडणूक निकालाने ते खरे ठरविले आहे.

छत्तीसगड काँग्रेसकडे

छत्तीसगडमध्ये 90 पैकी 63 जागांवर आघाडी मिळवून काँग्रेस बहुमत मिळवण्याच्या वाटेवर आहे. पंजाबनंतर अलीकडच्या काळातील हा मोठा विजय या पक्षासाठी आहे. रमणसिंगांची व पर्यायाने भाजपची 15 वर्षांची सत्ता भाजपने गमावली आहे. रमणसिंगांच्या कारकिर्दीतील तांदूळ घोटाळा यासह तेथील व्यापारी वर्गाचे ‘आम्ही काँग्रेसच्या बाजूने नाही परंतु भाजपच्या नोटाबंदी व जीएसटी धोरणाबाबत आम्हाला विरोध दर्शवायचा आहे’ हे म्हणणे, शेतकऱयांची दुरवस्था, नक्षलवादी उपद्रव हे घटक प्रामुख्याने सत्ताधाऱयांच्या विरोधात गेले आहेत. तेथील भाजप, काँग्रेस आणि अजित जोगी-मायावतीप्रणीत आघाडी या तिरंगी लढतीत होणारे मत विभाजन भाजपच्या बाजूने जाईल, असा कयास होता. परंतु तसे घडले नाही.

  मिझोराममध्ये काँगेसची सत्ता संपुष्टात

मिझोराममध्ये मिझोराम नॅशनल पंटने बहुमत मिळवून तेथील काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणली आहे. यामुळे पूर्वेकडील उरले सुरले राज्यही काँग्रेसच्या हातून निसटले आहे. अलीकडच्या काळात विशेषतः त्रिपुरावरील विजयानंतर भाजपने पूर्वेवर आपला वरचष्मा प्रस्थापित केला होता. मिझोराम नॅशनल प्रंट हा केंद्रात भाजप आघाडीतील पक्ष असल्याने भाजपसाठीही हा विजय दिलासादायक आहे.  साऱया निवडणूक निकालांचे तात्पर्य एका वाक्यात सांगायचे तर या निकालाने राहुल गांधींच्या काँग्रेसवरील नेतृत्त्वावर विश्वास दाखवताना नरेंद्र मोदी-अमित शहा प्रणीत भाजपच्या नेतृत्त्वाबाबत शंका घेण्यास आरंभ केला आहे. सत्ताधाऱयांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

अनिल आजगावकर 9480275418