|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘सेमी फायनल’ मध्ये भाजपचा सफाया

‘सेमी फायनल’ मध्ये भाजपचा सफाया 

क्रिकेटमधे कसोटी, एकदिवशीय आणि ट्वेंटी-20 असे प्रकार प्रसिद्ध आहेत. नुकत्याच झालेल्या 5 राज्यातील  निवडणुकीत अगदी प्रचारापासून ते सरकार बनवण्यासाठी बनलेल्या परिस्थितीत याचा पुरेपूर प्रत्यय आला आहे. कसोटी क्रिकेटप्रमाणे पूर्वी बॅलेट पेपरच्या मोजणीला दोन दोन दिवस लागत असत. निवडणुकीत ईव्हीएमचा जमाना आला आणि क्रिकेटमध्ये वनडे आणि ट्वेंटी-20 प्रमाणे मिनिटा मिनिटाला परिस्थिती बदलणारा थरार या निवडणुकीतील मतमोजणीत अनुभवायला मिळाला. एक्झिट पोलप्रमाणे साधारणपणे काँग्रेसची सरशी होईल असे अंदाज समोर आले होते. राजस्थानमध्ये बदल होऊन चांगल्या बहुमताने काँग्रेस जिंकणार, छत्तीसगडमध्ये भाजप, मध्य प्रदेशमध्ये त्रिशंकू परिस्थिती, तेलंगणमध्ये तेलंगणा राष्ट्रवादी समिती जिंकणार तसेच मिझोराममध्ये काँग्रेस सत्ता गमावणार असे साधारण एक्झिट पोलचे अंदाज होते. मिझोराम आणि तेलंगणामध्ये हे अंदाज तंतोतंत बरोबर आल्याचे दिसते.

या निवडणुकीकडे 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाहिले जात होते. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. राजस्थान,  छत्तीसगडमध्ये चांगली कामगिरी करीत काँग्रेसने भाजपाकडून सत्ता खेचून घेतली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने तब्बल 65 जागा जिंकत इतिहास घडविला तर तिथे भाजपाला केवळ 15 जागांवर समाधान मानावे लागले आहे. लोकसभेची सेमी फायनल समजल्या जाणाऱया या विधानसभा निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते.

काँगेसची तीन राज्यात सत्ता निश्चित

आत्तापर्यंतचा पाच राज्यांचा निकाल पाहता काँग्रेस तीन राज्यात आपली सत्ता स्थापन करणार हे निश्चित. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या विजयाचा आनंद देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी साजरा करण्यास सुरुवात केली आहे. काही नेते दिल्ली येथील काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर फटाके फोडून जल्लोष करत आहेत तर जयपूर येथे सचिन पायलट यांच्या घराबाहेर कार्यकर्ते जल्लोष करत असलेले पहायला मिळत आहे.

कार्यकर्त्यांच्या वर्दळीने सतत गजबजलेल्या दिल्ली भाजप मुख्यालयाबाहेर स्मशान शांतता दिसून आली. तिन्ही राज्ये भाजपच्या हातातून गेली आहेत तर काँग्रेसने मिझोराम हातचे गमावले आहे. त्यामुळे लोकसभा सेमी फायनल म्हणून ज्या निवडणुकीकडे पाहिले जात होते त्या सेमी फायनलमध्ये भाजपला जोरदार फटका बसत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. हा धक्का इतका जोरदार बसला आहे की, दिल्लीतील भाजप मुख्य कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.

 पाच राज्यांचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर तसेही काँग्रेसच्या गोटात उत्साह होताच. तोच उत्साह आज जाहीर झालेल्या निवडणूक निकालानंतरही दिसत आहे. अधिकृत निकालानुसार काँग्रेसने राज्यस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये जोरदार मुसंडी मारत भाजपला सत्तेतून खाली खेचले आहे. मात्र, काँग्रेसला आपल्या हातचे छोटे राज्य मिझोराम राखता आलेले नाही. या ठिकाणी स्थानिक पक्षाने बाजी मारत भाजप आणि काँग्रेसलाही धक्का दिला आहे. या ठिकाणी भाजपला केवळ 1 जागा मिळाली आहे.

  तेलंगणामध्ये अपेक्षेप्रमाणे तेलंगणा राष्ट्रीय समितीने दोन तृतीयांश बहुमत मिळवले आहे. तिथे महागठबंधनाला मात्र जबरदस्त धक्का बसला असून केवळ 22 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 

या पाच राज्यातील निवडणुकीकडे 2019 च्या दृष्टीने पाहिल्यास होणारे परिणाम पाहणे उद्बोधक आहे.

 राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या हिंदी भाषिक राज्यातील आत्ताची लोकसभा खासदारांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.

 

या 65 जागांपैकी आजच्या सारखाच निकाल लागल्यास 2019 च्या निवडणुकीत  भाजपाच्या निम्या जागा जाऊ शकतात व तेवढा काँग्रेसला फायदा होऊ शकतो. रामविलास पासवान, नितीशकुमार, शिवसेना, अकाली दल हे भाजपचे मित्रप
क्ष आपल्या अटी कडक करीत जास्त जागांची मागणी करू शकतात, एनडीएमधून बाहेरही पडू शकतात. 2013 मध्ये मित्रपक्ष जसे काँग्रेसपासून फटकून वागत होते तसे भाजपाचेही होईल असे म्हणणे योग्य होणार नाही, पण भाजपासाठी ही धोक्मयाची घंटा आहे एवढे नक्की.

 काँगेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधींना मिळालेले हे फार मोठे यश आहे. योगायोगाने या निकालाच्या दिवशीच त्यांनी अध्यक्षपद स्वीकारून एक वर्ष झाले. पहिल्या वर्षपूर्तीची ही त्यांना अनोखी भेटच मिळाली असे म्हणायला हवे. आता काँग्रेसला काही मित्र मिळू शकतात, महागठबंधनच्या राजकारणात काहीतरी वजन येऊ शकते व लोकसभेच्या निवडणुकीत चांगले यश मिळू शकते. ऑगस्ता वेस्टलँड प्रकरणातील दलालाला झालेली अटक, विजय मल्ल्याचे होऊ घातलेले प्रत्यार्पण, रॉबर्ट वड्रा प्रकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नॅशनल हेराल्ड केसमधे राहुल अथवा सोनिया गांधींना न्यायालयाने दोषी ठरविल्यास काँग्रेसची अवस्था बिकट होऊ शकते हेही विसरून चालणार नाही.

मध्य प्रदेश-

    एकूण जागा 29

    भाजप 26

    काँग्रेस 3

राजस्थान-

    एकूण जागा 25

    भाजप 24

    काँग्रेस 1

छत्तीसगड –

    एकूण जागा 11

    भाजप 10

    काँग्रेस 1

विलास पंढरी  – 9860613872