|Thursday, July 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म 

भक्ती व ज्ञान यांच्या परस्पर पूरक भूमिकांविषयी चिंतन मांडताना भागवताचार्य वै. डोंगरे महाराज म्हणतात-काही ज्ञानी असें समजतात की त्यांना भक्तीची आवश्यकता नाही. ते भक्तीचा तिरस्कार करतात. याचप्रमाणे काही भक्तजन ज्ञान आणि वैराग्याची उपेक्षा करतात. या दोघांचेही दृष्टीकोन चुकीचे आहेत. भक्ती आणि ज्ञान परस्परांचे पूरक आहेत. भक्ती आणि ज्ञान दोघांचीही आवश्यकता आहे. ज्ञान, वैराग्यासहित भक्ती असली पाहिजे. वैराग्याविना भक्ती कच्ची राहते. दोघांनाही एकमेकाची आवश्यकता आहे.

उद्धव ज्ञानी होते पण त्यांच्या ज्ञानाला भक्तीची जोड नव्हती. भक्तीरहित ज्ञान अभिमानी होते. भक्ती ज्ञानाला नम्र करीत असते. भक्तीची जोड नसेल तर ज्ञान अभिमानामुळे जीवाला उद्धट करील. ब्रह्मज्ञान झाल्यानंतरही जर स्वरूपावर प्रीति नसेल तर ब्रम्हानुभव व्हायचा नाही. खरा ज्ञानी तोच की जो परमेश्वरावर प्रेम करतो. ज्ञानी झाल्यावर धन, प्रति÷ा, आश्रम इत्यादींचे स्मरण जरी राहिले तर पतनच होईल. ज्ञानाला देखील भक्तीची आवश्यकता आहे. जीव ईश्वरावर जेव्हा प्रगाढपणे प्रेम करू लागेल तेव्हाच तो आपल्या मूळ रूपाचे दर्शन देईल. मनुष्य आपली सर्व धनसंपत्ती केवळ आपल्या खास व्यक्तींनाच दाखवत असतो, सांगत असतो. भगवंतही तसेच आहेत. ते सुद्धा आपल्या खऱया भक्तालाच आपले खरे रूप दाखवितात. जर एक साधारण मनुष्य देखील आपल्या प्रेमाच्या व्यक्तीशिवाय कोणालाही आपले अंतर दाखवीत नाही तर भगवंतांनी सुद्धा आपल्या भक्ताशिवाय दुसऱया कोणाला आपले रूप का दाखवावे?

भक्तीशिवाय ज्ञान आणि ज्ञानाशिवाय भक्ती अपूर्ण आहे. भक्तीला जर ज्ञानाची जोड नसेल तर ईश्वराच्या सर्व व्यापकतेचा अनुभव येऊ शकणार नाही. एकाच जागी आणि एकाच वस्तूमधे ईश्वराचे अस्तित्व मानणारा वैष्णव अधम आहे. प्रत्येक ठिकाणी ईश्वराला पाहणारा महान वैष्णव आहे. तुकाराम महाराज तर वैष्णावाचे धर्मलक्षण कोणते हे सांगताना म्हणतात- विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।भेदाभेद भ्रम अमंगळ ।। अइका जी तुम्ही भक्तभागवत ।कराल तें हित सत्यकरा ।।कोणाही जिवाचा न घडो मत्सर ।वर्म सर्वेश्वरपूजनाचें  ।। तुका म्हणे एका देहाचे अवयव ।सुख दु:ख जीव भोग पावे  ।।

उद्धवांचे तत्त्वज्ञान आणि गोपींची प्रेमलक्षणा भक्ती दोन्हीही आपापल्या जागी महत्त्वपूर्ण आहेत. परंतु दोघांचाही समन्वय आवश्यक आहे. उद्धवांची नि÷ा ज्ञानात आहे आणि गोपींची प्रेमात. ज्ञान प्रेमाविना शुष्क आहे, निरर्थक आहे. परमात्म्याचे ज्ञान झाल्यावर सुद्धा जर त्यांच्यावर प्रेम जडू शकले नाही तर परमात्म्याचा अनुभव होऊ शकणार नाही. ज्ञान प्राप्त झाल्यावर सुद्धा प्रेमाची प्राप्ती तर करावीच लागेल. गोपी प्रेमाच्या ध्वजा आहेत, तर उद्धव ज्ञानाची मूर्ती! ज्ञान, भक्ती आणि वैराग्य तिन्हींचा समन्वय झाल्यावरच परमेश्वराचा साक्षात्कार होईल. उद्धव ज्ञानी होते, पण त्यांचे हृदय प्रेमशून्य होते, शुष्क होते.

Ad. देवदत्त परुळेकर