|Friday, July 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पराभव सत्तेच्या गुर्मीचा…!

पराभव सत्तेच्या गुर्मीचा…! 

काँग्रेसमुक्त भारताचा नारा लावीत पप्पू नावाने कुचेष्टा करणाऱया मोदी सरकारला 5 पैकी 4 राज्यातील जनतेने जी धूळ चारली ते पाहता भाजपचे ‘अच्छे दिन’ संपुष्टात येत आहेत. लोकसभा निवडणुकीस केवळ 4 महिने शिल्लक असतानाच्या या सेमी फायनलमध्ये जनतेच्या प्रचंड आशीर्वादाने लोकप्रियतेच्या शिखरावर 2014 मध्ये बसलेल्या भाजपाला आता उतरती कळा लागली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मध्य प्रदेश हा भाजपचा बालेकिल्ला तद्वत छत्तीसगढ हा देखील बालेकिल्लाच आहे. दर पाच वर्षांनी सत्तांतर करून लोकशाहीस योग्य न्याय देणाऱया राजस्थानने आपली 25 वर्षांची परंपरा कायम राखली व हा निकाल अपेक्षितच होता, परंतु लोकप्रियतेच्या उंचीवर नेऊन बसलेल्या मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान व छत्तीसगढमध्ये डॉ. रमणसिंग यांच्यावर जनतेने क्यक्त केलेला राग काही औरच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमधील पराभव हा निश्चितच लाजीरवाणा तर आहेच शिवाय जनतेने केंद्रातील भाजप सरकारला देखील सांगून टाकले की आम्हाला गृहीत धरू नका. 15 वर्षे सातत्याने राज्य करणाऱया भाजपला मध्य प्रदेश आणि छत्तीसगढने असे का ठोकरून लावले याचा भाजपने गंभीरपणे विचार करावा. भाजपने निश्चितच आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. काँग्रेसमुक्त भारताचा नारा लावला व त्यात अनेक राज्यांनी प्रतिसाद दिला ते ठीक आहे, परंतु यामुळे भाजपच्या कैक नेत्यांनी सत्तेची उरलेली नशा आणि गुर्मी दाखविली आणि भाजपचा प्रयोग फसला. मध्य प्रदेश असो, राजस्थान असो वा छत्तीसगढमध्ये जनतेने राहुल गांधींच्या पारडय़ात जे टाकले आहे ते केवळ त्यांच्या काँग्रेसच्या प्रेमाखातर नाही तर भाजपपासून मुक्त व्हायचे होते. गेल्या 3 वर्षात मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेस नेत्यांनी जो काही जोर लावून भाजप सरकारविरोधात जे काही काम केले आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी जी पावले उचलली त्याचे फलित आहे. छत्तीसगढचे विकासपुरुष म्हणून डॉ. रमणसिंग यांची ओळख होती. विकासाचे दरवाजे त्यांनी खोलले खरे परंतु या विकासाचे नेमके लाभ गोरगरीब शेतकरी वर्गापर्यंत पोहोचतात की नाही याची गेल्या दोन कालावधीत जेवढी दखल घेतली, जबाबदारी घेतली तेवढी जबाबदारी 2014 मध्ये केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर घेतली गेली नाही. शेतकऱयांचा जो आक्रोश वाढला, महिलांवर अत्याचार वाढले आणि भाजपला आतापर्यंत सर्वाधिक बंडखोरांशी सामना करावा लागला ही सर्व कारणे पाहता शिवराजस्ंिाह असोत वा डॉ. रमणसिंग या दोघांच्या हातून सत्ता निसटणार हे निश्चित झाले होते. केवळ 1 वर्षापूर्वी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची कमान सांभाळली होती. त्याच राहुल गांधींनी मंगळवारी भाजपच्या हातून 3 राज्ये खेचून आणली व ‘मै भी कुछ कम नही’ हे मोदींना दाखवून दिले. भाजपने नवीन नवीन राज्ये जिंकण्यात आपली शक्ती जेवढी खर्ची घातली तेवढी जुनी राज्ये वाचविण्यासाठी काहीही केले नाही. त्याचे परिणाम मोदी आणि अमित शहा जोडीला भोगावे लागले. पाच राज्यातील निवडणुकीत मागीलवेळी सत्तेवर आलेल्या तेलंगणामध्ये के. सी. राव यांच्या गुलाबी फौजेने मागीलपेक्षा यावेळी जादा चमक दाखवून आपला गड मजबूत ठेवण्यात घवघवीत यश प्राप्त केले. मिझोराममध्ये मात्र काँग्रेसचा धुव्वा उडाला. या एकमेव छोटय़ा राज्यातील पराभवाने पूर्वोत्तर राज्यातून काँग्रेस हद्दपार झाली. जनतेने दिलेला कौल भाजपच्या जिव्हारी लागणारा आहे. जनतेने सत्ताधाऱयांना दिलेले चटके म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षात बसण्याची तयारी करा, असा संदेश देणारे आहेत. दोन दिवसांपूर्वीच भाजप विरोधात देशातील बहुतांश राष्ट्रीय पक्ष एकत्र आले मात्र त्यांच्या एकत्रिकरणाचे नेतृत्व ठरले नव्हते. तीन राज्यातील घवघवीत यशानंतर या यशाचे शिल्पकार असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व आता विरोधी पक्षांना मान्य करावेच लागेल. पाच राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांची झालेली घसरण पाहता भाजपचे अच्छे दिन संपुष्टात आले आहेत. ही धोक्याची घंटा जनतेने वाजविली आहे. मध्य प्रदेशसारखे महत्त्वाचे राज्य भाजपच्या हातून जावे हा सर्वांत मोठा धक्का भाजपला बसलेला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अमित शहा अध्यक्ष झाल्यापासून केवळ पंजाब वगळता भाजपला कुठेही आजपर्यंत नुकसान झाले नाही. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सेमी फायनलमध्ये भाजपला जबरदस्त पराभवास सामोरे जावे लागले याचाच अर्थ जनतेने आगामी लोकसभा निवडणुकीत कोणते चित्र असेल याची उघड कल्पना दिलेली आहे. या निकालाने एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे मोदींच्या भाषणाचा करिष्मा आता उतरला. या निवडणुकीत जरी स्थानिक मुद्दे चर्चेत असले तरी देखील राष्ट्रीय नेते प्रचारात सर्वशक्तीनिशी उतरले होते जे आता लोकसभा निवडणुकीदरम्यान उतरतील. स्थानिक मुद्दे वेगळे असले तरी जनतेने दिलेला कौल हा भाजपच्या राज्यांमध्ये प्रस्थापितांविरूद्धचा कौल होता. मिझोराममधे जनतेने प्रस्थापिताविरुद्ध कौल देताना काँगेसचा धुव्वा उडवला. त्याचप्रमाणे छत्तीसगढमध्येही अनपेक्षितपणे जनतेने भाजपचा धुव्वा उडविला आहे. भाजपसाठी ही धोक्याची घंटाच असे नाही तर आगामी काळात भाजपला कठीण दिवस असतील. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विरोधी पक्ष एकत्रित येत आहेत. ऐन निवडणुकीत या महागठबंधनाने कित्येक ठिकाणी फूट पडणार हे जरी निश्चित असले तरी देखील भाजपला आगामी लोकसभा निवडणूक अत्यंत तापदायक जाईल हे निश्चित. केंद्रातील भाजपची लोकप्रियता घटते आहे. मोदींचा करिष्मा आता शिल्लक राहिलेला नाही हे या ताज्या निकालावरून स्पष्ट होते. या निवडणुकीतून बरेच काही शिकता येईल, मात्र त्यासाठी सत्तेच्या गुर्मीतून बाहेर पडणे आवश्यक आहे. जोडगोळीला ते शक्य आहे का? हा पराभव गुर्मीचा आहे हे जरी कळले तरी तो शहाणपणा ठरेल…!