|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी

तिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन 12 रोजी 

प्रतिनिधी/ पणजी

तिसऱया मांडवी पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 12 जानेवारी रोजी करण्याचे निश्चित झालेले असून या पुलाच्या डांबरीकरणाला पुढील आठवडय़ात प्रारंभ होईल. सुमारे 20 कोटी रुपये खर्चुन विद्युत रोषणाईचे कामही तातडीने हाती घेण्यात येत आहे.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मांडवीवरील तिसऱया पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झालेले आहे. दोन्ही बाजूंनी पूल आणि रस्ते एकमेकांना जोडण्यात आलेले आहेत.

संरक्षक कठडय़ामुळे दुचाकींना भिती नाही

पुलाच्या दुतर्फा कठडय़ामुळे भिंतीचे कामही पूर्ण झालेले आहे. पूर्वी छोटे छोटे खांब घालून त्यावर थोडा स्लॅब घातला जात असे. आता दोन्ही बाजूला एक ते दीड मीटर एवढय़ा उंचीचे काँक्रिटच्या कठडय़ाचे बांधकाम केले आहे. या पुलाला बरीच मोठी उंची असल्याने वाऱयामुळे वाहनाचा तोल जाऊ शकतो. या संरक्षक कठडय़ाचे बांधकाम पूर्ण भिंत सदृष्य झाल्याने आता वाऱयाचा दाब या पुलावर वाढणार नाही. त्यामुळे वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना कोणतीही समस्या उद्भवणार नाही. या पुलावर कमाल ताशी 40 किलोमीटर एवढय़ा वेगाने वाहने हाकावी लागणार आहे.

सोमवारपासून सुरु होणार डांबरीकरण

या पुलावर सोमवारपासून डांबरीकरणास प्रारंभ होईल. 30 डिसेंबरपर्यंत पुलाचे 100… बांधकाम पूर्ण होईल. त्यानंतर हायवेच्या नियमानुसार वजन ठेऊन पुलाच्या क्षमतेची रितसर तपासणी करून नंतर वाहतुकीस खुला करण्याकरीता परवानगी मिळविली जाईल.

आकर्षक रंगसफेदी… आकर्षक विद्युत रोषणाई

सध्या या पुलाच्या रंगसफेदीचे काम जोरात सुरु आहे. आकर्षक रंग लावण्यात येत आहेत. या पुलाद्वारे पर्यटकांनादेखील आकर्षित करण्याचा सरकारचा इरादा आहे. पुलावरील प्रत्येक केबल रात्रीच्या वेळी रंगीबेरंगी दिसतील. पुलाच्या खांबाला खालून वीज दिवे बसविले जातील. दर्शनी भागावर फसाड लाईट बसविले जातील. याशिवाय पुलाच्या दोन्ही बाजूंवर वीज दिवे बसवून वाहन चालकांची सोय केली जाईल. या आकर्षक विद्युत रोषणाईवर सुमारे 20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या पुलामुळे अगोदरच्या दोन्ही पुलांचे भाग्यही फळफळणार आहे. या पुलांवरही आकर्षक एलईडी दिव्यांची रोषणाई करण्याचा सरकारचा इरादा असून नव्याने वीज खांब उभारले जाणार आहेत.