|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण

बस्तवाडमध्ये आज शिवपुतळय़ाचे अनावरण 

वार्ताहर / किणये

छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात अन् ढोल-ताशांच्या गजरात राजमुद्रेची भव्य मिरवणूक बस्तवाड-हलगा गावात मंगळवारी सायंकाळी काढण्यात आली. शिवपुतळय़ाच्या अनावरण सोहळय़ाच्या पार्श्वभूमिवर ही जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली.

छत्रपती शिवराय सृष्टी युवक मंडळाच्यावतीने गावातील धर्मवीर संभाजी चौकात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या शिवपुतळय़ाचे अनावरण बुधवार दि. 12 रोजी दुपारी 4 वाजता करण्यात येणार आहे. शिवपुतळा अनावरण सोहळय़ाच्या पार्श्वभूमिवर मंगळवारी सायंकाळी गावात शिवरायांच्या राजमुद्रेची मिरवणूक काढण्यात आली. सजविलेल्या ट्रक्टरमध्ये राजमुद्रा ठेवण्यात आली होती. गावातील महिला व मुली कलश घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. ढोल-ताशा पथकाच्या गजरात संपूर्ण गावभर रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. गावातील प्रत्येक गल्लीमध्ये सुवासिनी महिलांनी आरती ओवाळून मिरवणुकीचे स्वागत केले.

शिवपुतळय़ाचे अनावरण होणाऱया चौकात सर्वत्र भगव्या पताका व भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. यामुळे गाव भगवेमय झाले आहे. बुधवारी सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला अभिषेक घालून विधिवत पूजा-अर्चा करण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार अनिल बेनके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवपुतळय़ाचा अनावरण सोहळा होणार आहे.

शिवपुतळय़ाचे अनावरण झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील शिवपेमींनी या सोहळय़ाला उपस्थित रहावे, असे मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने कळविण्यात आले आहे.