|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गुरुवारी सुवर्णसौधला घेराव

गुरुवारी सुवर्णसौधला घेराव 

रयत संघटनेचा पत्रकार परिषदेत इशारा

प्रतिनिधी/ बेळगाव

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शेतकऱयांशी व साखर कारखानदारांची बैठक घेतली. तब्बल सात तास ही बैठक झाली. मात्र या बैठकीमधून काहीच निष्पन झाले नाही. शेतकऱयांना या सरकारने केवळ आश्वासने दिली आहेत. एफआयआरपी प्रमाणे दर देण्यात येणार नाही. त्यामुळे शेतकऱयांची फसवणूक असून सरकारने ठोस निर्णय जाहीर करावा, या मागणीसाठी गुरुवारी सुवर्णसौधला घेराव घालणार असल्याचे बागलकोट जिह्याचे शेतकरी नेते कल्लाप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱयांनी शनिवारपासूनच आंदोलन छेडले आहे. ऊस बिल, ऊस दर, कर्जमाफी, विमा यासह इतर समस्यांसंदर्भात शेतकऱयांनी हे आंदोलन सुरु केले आहे. कोणत्याही परिस्थितीत आमच्या समस्या सोडवा, अन्यथा हे आंदोलन सुरुच ठेवू, असा इशारा शेतकऱयांनी दिला आहे. महत्वाचे म्हणजे सिध्दाप्पा मोदगी यांनी मंगळवारपासून आमरण उपोषणही सुरु केले आहे.

यावेळी पत्रकार परिषद घेऊन गुरुवारी सुवर्णसौधला घेराव घालणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एफआरपी प्रमाणे दर देण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र यामध्ये जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱयांना त्याचा मोठा फटका आहे. शेतकऱयांची ही फसवणूक असून सरकार आणि साखर कारखानदारांनी ही फसवणूक केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. गुरुवारी तीव्र आंदोलन करण्यात येणार असून जोपर्यंत सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार, असेही यावेळी सांगण्या त आले.

अनेक साखर कारखान्यांनी शेंतकऱयांची मागील ऊस बिले दिली नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. याचबरोबर पिक विमाही मिळाला नाही. सरकारने केवळ शेतकऱयांची बैठक घेऊन भरवसा दिला होता. मात्र प्रत्यक्षात कोणत्याच हालचाली करण्यात आल्या नाहीत. हा शेतकऱयांवर अन्याय असून जोपर्यंत आपल्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहिल, असे यावेळी सांगण्यात आले.

सिध्दगौडा मोदगी, जयश्री गुरण्णावर, चुन्नाप्पा पुजेरी, अशोय यमकनमर्डी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱयांनी आंदोलन छेडल्यामुळे त्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.