|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » धनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल

धनंजय मुंडेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल 

महामेळाव्यात सहभाग घेतल्याचे कारण, कर्नाटकी पोलिसांचा प्रताप

प्रतिनिधी/ बेळगाव

कर्नाटक विधानसभा अधिवेशनाला विरोध करण्यासाठी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे घेण्यात आलेल्या सीमावासियांच्या महामेळाव्यात उपस्थित राहिलेले महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर कर्नाटकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकात धनंजय मुंडे यांच्याबरोबरच शिवसेना नेते विजय देवणे आणि इतर सात अशा एकूण 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भा.दं.वि. कलम 341, 188, 283, सहकलम 34 आणि 109 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी व्हॅक्सीनडेपो मैदानाशेजारील खुल्या रस्त्यावर हा महामेळावा घेण्यात आला होता. प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे मैदानावर हा मेळावा घेता आला नाही. मात्र कर्नाटक सरकारचा निषेध सांकेतिक पध्दतीने करण्यासाठी म. ए. समितीने महामेळावा आयोजित करुन सीमावासीयांची भूमिका मांडली.

या महामेळाव्यात महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांची कर्नाटक सरकारच्या हीन कृतीचा निषेध करणारी भाषणे झाली होती. याचबरोबरीने समिती नेत्यांनीही महामेळाव्याची पार्श्वभूमी स्पष्ट करतानाच या प्रकारचा महामेळावा घेण्याचा घटनात्मक अधिकार कसा डावलण्यात येत आहे, याची माहिती जाहीर भाषणांद्वारे दिली होती.

महामेळाव्याच्या पार्श्वभूमिवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवून अडवणूक करण्याचा आणि दहशत माजविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केल्याबद्दल नाराजी व्यक्त झाली होती. हीच नाराजी आपल्या जाहीर भाषणात मांडण्यात आल्यानंतर संबंधित कलमांव्दारे टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपला अधिकृत दौरा पाठविलेला असताना त्यांना प्रोटोकॉल देण्यास कर्नाटक सरकारने असमर्थता दर्शविली. तसेच महामेळाव्याला उपस्थित राहण्यापासून त्यांचीही अडवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांना चकवून धनंजय मुंडे मेळाव्यास्थळी दाखल झाले. या प्रकाराने चिडलेल्या पोलीस प्रशासनाने आता गुन्हे दाखल करुन आपला कंडू शमवून घेण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे दिसून आले आहे.

यापूर्वीही महामेळाव्याला तसेच सीमावासीयांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱया महाराष्ट्रातील नेत्यांना या प्रकारच्या पोलीस कारवाईचा सामना करावा लागला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने सीमाभागात संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्रातही याबद्दल संताप व्यक्त झाला आहे. कर्नाटक सरकारला आणि प्रशासनाचा खरा चेहराही यामुळे उघडकीस आला आहे.

Related posts: