|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले

दुष्काळाच्या मुद्दय़ावर सरकारला घेरले 

बी. एस. येडियुराप्पा यांची युती सरकारवर टिका

दुष्काळाच्या मुद्दय़ावर प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपने युती सरकारला घेरण्याची व्युह रचना केली आहे. मंगळवारी विरोधीपक्षनेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी प्रश्नोत्तरांच्या तासानंतर या मुद्दय़ावर स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र सभाध्यक्षांनी नियम 69 अन्वये चर्चेची अनुमती दिली.

गेल्या 25 ते 30 वर्षांच्या तुलनेत यंदा भीषण दुष्काळ आहे. राज्य सरकारने 100 तालुके दुष्काळग्रस्त घोषीत केले आहेत. आणखी 20 ते 25 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत करावे लागणार आहेत. चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याकडे युती सरकारने केवळ दुर्लक्षच केले आहे. चारा छावण्या सुरु केल्या नाहीत. किंवा गोशाळाही सुरु केल्या नाहीत. पिण्याच्या पाण्याची तर मोठी टंचाई आहे. मात्र यावर सरकारने कोणतीच उपाय योजना केल्या नाहीत, याचा  आपल्याला खेद वाटतो, असे येडियुराप्पा यांनी सांगितले.

मंगळवारी दुपारी 12.30 वाजता प्रश्नोत्तरांच्या तासानंतर सभाध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी विरोधीपक्षनेत्यांना या विषयावर आपले मुद्दे मांडण्यास अनुमती दिली. त्यावेळी मुख्यमंत्री कुमारस्वामी, महसुलमंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्यासह प्रमुख मंत्री अनुपस्थित होते. भाजप आमदारांनी याला आक्षेप घेतला. दुष्काळासारख्या प्रमुख मुद्दय़ावर चर्चा सुरु असताना मंत्रीसभागृहात नाहीत. मग कोणासमोर मुद्दे मांडायचे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पालकमंत्री दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करीत नाहीत. अधिकारीही कुठे पोहोचले नाहीत. सरकार झोपेत आहे का? सत्तेवर आल्यानंतर केवळ 24 तासात शेतकऱयांच्या कर्जमाफीची घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली होती. निजदचा जाहीरनामाच खोटा आहे. त्यामुळेच त्यांना केवळ 38 जागा मिळाल्या. 38 जागा मिळवून काँग्रेसच्या मदतीने कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. तुम्ही शेतकऱयांच्या मदतीला धावला असता तर निश्चितच आम्ही तुमचे अभिनंदन केले असते. तुम्ही शेतकऱयांच्या डोळय़ात धुळफेक करीत आहात, त्यामुळे सत्तेवर राहण्यास तुम्ही अयोग्य आहात, अशा शब्दात येडियुराप्पा यांनी सरकारवर टीका केली.

परिस्थिती अशी असुनही काँग्रेस कसे गप्प बसले हे कळत नाही. सरकारवर बोजा नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी शासकीय बंगला घेतला नाही. जी. पी. नगर येथील बंगल्यात वास्तव्य करणार असल्याची घोषणा करणाऱया मुख्यमंत्र्यांनी ‘वेस्टएन्ड’ सारख्या तारांकित हॉटेलमध्ये दोन खोल्या घेतल्या आहेत. वर्षाचे त्याचे भाडेच दोन कोटी होते. हे भाडे कोण भरणार? आता मंत्री आमदारांनाही तेथेच खोल्या मिळवून द्या, सामान्यांना सहजपणे भेटणारा मुख्यमंत्री आपणच असा दावा एक वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत कुमारस्वामी यांनी केला आहे. वेस्टएन्ड हॉटेलमध्ये तुम्हाला भेटण्यासाठी सर्वसामान्य लोक किती येतात की केवळ बदल्यांचा धंदा करण्यासाठी त्या खोल्यांचा वापर करत आहात? असा प्रश्न येडियुराप्पा यांनी उपस्थित केला.

अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्र्यांचे वास्तव्य शासकीय विश्रामधामावर असते. तेथे आमदार, अधिकारी व सर्वसामान्य नागरिक मुख्यमंत्र्यांना भेटायला येतात. यंदा कुमारस्वामी यांनी आपले बस्तान व्हीटीयु वसतीगृहात का बदलले? या वसतीगृहात लांबचा पल्ला गाठून तुम्हाला भेटण्यासाठी किती लोक येतात? असा प्रश्न उपस्थित करुन सार्वजनिक बांधकाम, पाठबंधारेसह विविध खात्यांची 12 हजार कोटी रुपयांची बिले थकली आहेत. महत्वकांशी सायकल वितरण, विद्यार्थ्यांना बसपास, शाळकरी मुलांना गणवेश आदी योजना तर स्थगित झाल्या आहेत.

चौकट करणे

मुख्यअभियंते पदासाठी 10 कोटी

सार्वजनिक बांधकाम खात्यात अधिकाऱयांच्या बदल्या करण्यासाठी दरपत्रकच ठरविण्यात आला आहे. एका वृत्तपत्रात हा दरपत्रक छापून आला होता. सरकारतर्फे कोणीही त्याचा इनकार केला नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यांच्या पदासाठी 10 कोटी रुपयांचा दर ठरविण्यात आला आहे. एखाद्या योजनेसाठी 100 कोटी रुपये निधी मंजूर झाला तर प्रत्यक्षात 40 कोटीही खर्च केला जात नाही. यावरुन युती सरकारमध्ये काय चालले आहे? हे लक्षात येते, असे येडियुराप्पा यांनी सांगितले.