|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर

मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर 

पुणे / प्रतिनिधी:

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे गुहागर शाखा, आयोजित विभागीय मराठी साहित्य सम्मेलन 14 ते 16 डिसेंबरदरम्यान गुहागरला पोलीस परेड मैदान देवपाट येथे होणार आहे. मराठी रंगभूमीवरील आधुनिकोत्तर कालखंडातील महत्वाचे नाटककार कथाकार आणि कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उदघाटन कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते होणार आहे, यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, विभागीय संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य तानसेन जगताप, मसापचे कोकण विभाग प्रतिनिधी प्रकाश देशपांडे आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

प्रा. जोशी म्हणाले, मसापच्या यंदाच्या विभागीय साहित्य सम्मेलनाच्या आयोजनाचा मान मसापच्या गुहागर शाखेला मिळाला आहे. तीन दिवस चालणाऱया या साहित्य सम्मेलनाची सुरुवात 14 डिसेम्बरला सकाळी ग्रंथदिंडीने होणार आहे. सायंकाळी स्थानिकांचे कविसंमेलन होणार असून, कोकणी लोककला या सांस्कृतिक कार्यक्रमात गणेश वंदना, मंगळागौर, पालखीनृत्य, कोळीनृत्य, शेतकरीनृत्य आणि नमन या लोककलांचे सादरीकरण होणार आहे. 15 डिसेंबरला सकाळी ‘लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला’ हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ‘मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी’ या विषयावरील चर्चेत लेखक अरविंद जगताप आणि अभिनेता गिरीश कुलकर्णी सहभागी होणार आहेत. त्यानंतर कथाकथनाचा कार्यक्रम होणार असून त्यात आप्पासाहेब खोत (कोल्हापूर), ज्योतीराम फडतरे (सोलापूर), रवींद्र कोकरे (फलटण), अनुप्रिता वैद्य (रत्नागिरी), श्रीराम दुर्गे (चिपळूण) आणि मनाली बावधनकर (गुहागर) यांचा सहभाग असणार आहे.

सायंकाळी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रकट मुलाखत प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे घेणार आहेत. रात्री प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. पुल, गदिमा आणि बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘काव्य नव्हे हा अमृतसंचय’ हा विशेष कार्यक्रम चैत्राली अभ्यंकर आणि सहकारी सादर करणार आहेत. 16 डिसेंबरला सकाळी ‘आमची बोली आमची भाषा’ या विषयावरील परिसंवाद विनय बापट यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सकाळी 11 ते 12.30 या वेळेत 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांची प्रकट मुलाखत प्रा. मिलिंद जोशी आणि आसावरी जोशी घेणार आहेत तसेच त्यांचा विशेष सत्कार कोकणवासीयांच्या वतीने करण्यात येणार आहे. यानंतर ‘हास्य कवी संमेलन’ होणार आहे. सायंकाळी 4 ते 5 यावेळेत ‘कारगिल विजय’ या विषयावर अनुराधा गोरे यांचे व्याख्यान होणार आहे. यानंतर संमेलनाचा समारोप मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.