|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » केवळ 4337 मतांनी हुकले मुख्यमंत्रिपद

केवळ 4337 मतांनी हुकले मुख्यमंत्रिपद 

वृत्तसंस्था /भोपाळ :

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत देणाऱया भाजपला 109 जागांवर समाधान मानावे लागले. सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी  शिवराज सिंग चौहान यांच्या हातून किरकोळ मतांच्या अंतरामुळे निसटली आहे. 7 मतदारसंघांमध्ये भाजपला 4337 अधिक मते मिळाली असती तर भाजपने बहुमताचा (116) आकडा पार केला असता.

निवडणूक आयोगाची आकडेवारी पाहिल्यास भाजप केवळ 4337 मतांनी मागे राहिला आहे. 7 मतदारसंघांमध्ये भाजपला 1000 हून कमी मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे. मध्यप्रदेशात 10 जागांवरील विजयाचे अंतर 1 हजारापेक्षाही कमी होते. यातील 7 जागा काँग्रेसच्या तर 3 जागा भाजपच्या वाटय़ाला आल्या आहेत.

ग्वाल्हेर दक्षिण मतदारसंघ

भाजपला जर 4337 मते अधिक मिळाली असती तर पक्ष या 7 जागांवर विजयी झाला असता. या 7 मतदारसंघांमध्ये सर्वात कमी अंतर ग्वाल्हेर दक्षिण जागेवर राहिले असून काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पाठक यांनी भाजपचे उमेदवार नारायण सिंग कुशवाह यांना केवळ 121 मतांनी पराभूत पेल. तर माळवा क्षेत्राच्या मंदसौर जिल्हय़ातील सुवासरा मतदारसंघात काँग्रेसचे दंग हरदीप सिंग यांनी भाजपच्या राधेश्याम नानालाल पाटीदार यांच्याविरोधात केवळ 350 मतांनी विजय मिळविला आहे.

ब्यावरा येथे काँग्रेचे गोवर्धन दंगी यांनी भाजपच्या नारायण सिंग पंवर यांना 826 मतांनी पराभूत केले. दमोहमध्ये काँग्रेसचे राहुल सिंग यांनी भाजपच्या जयंत मलैया यांच्यावर 798 मतांनी विजय प्राप्त केला आहे. जबलपूर उत्तरमध्ये काँग्रेसचे विनय सक्सेना यांनी भाजपच्या शरद जैन यांना 578 मतांनी पराभूत केले आहे. राजनगरमध्ये काँग्रेसचे विक्रम सिंग यांनी भाजपच्या उमेदवाराला 732 मतांनी हरविले आहे. राजपूरमध्ये काँग्रेसच्या बाला बच्चन यांनी भाजपच्या देवीसिंग पटेल यांना केवळ 932 मतांनी पराभूत केले आहे.