|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » संसदेचे रक्षण करणाऱया हुतात्म्यांना वंदन

संसदेचे रक्षण करणाऱया हुतात्म्यांना वंदन 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

2001 साली संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी एकाच कार्यक्रमात उपस्थित होते. परंतु दोघांनीही परस्पराशी बोलणे टाळले.

पंतप्रधान मोदींनी यावेळी मनमोहन सिंग यांची विचारपूस केली असली तरीही राहुल यांच्याशी संभाषण टाळल्याने दोन्ही नेत्यांमधील कटूता पुन्हा एकदा उघड झाली आहे. राहुल यांनी संसदेत हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्रीय मंत्री विजय गोयल आणि सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल यांच्यासोबत हस्तांदोलन केले.

राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि संपुआ अध्यक्षा सोनिया गांधी देखील या कार्यक्रमात उपस्थित होत्या.

17 वर्षांपूर्वी संसदेवर 5 दहशतवाद्यांनी हल्ला चढविला होता. या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे 5 जवान तसेच सीआरपीएफ कॉन्स्टेबलला वीरमरण आले होते. तर 4 नागरिकांनी या हल्ल्यात जीव गमाविला होता. हल्ल्यात सामील सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास यश आल्याने मोठी जीवितहानी टळली होती.