|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » श्रीपेवाडी बसवान मंदिरात जीर्णोद्धार होमहवन

श्रीपेवाडी बसवान मंदिरात जीर्णोद्धार होमहवन 

वार्ताहर /निपाणी :

श्रीपेवाडीचे ग्रामदैवत बसवान मंदिराचा ग्रामस्थ, भाविक यांच्या देणगीतून जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या जीर्णोद्धाराच्या पार्श्वभूमीवर मंदिरासमोर असणारे हनुमान मंदिर काढण्यासाठी जीर्णोद्धार होमहवन गुरुवारी करण्यात आला. यामध्ये गावातील 11 दाम्पत्यांच्या हस्ते ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत हा पूजाविधी पार पडला.

गेल्या दीड महिन्यांपासून जीर्णोद्धारासाठी देणगी संकलन सुरु आहे. यामध्ये प्रथम मंदिराच्या शिखर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. 40 लाखाचा खर्च अपेक्षित धरून सध्या निधी संकलनाचे काम सुरु आहे. ग्रामस्थ व भाविकांकडून स्वइच्छेने देणगी दिली जात आहे. जमा होणारा निधी लक्षात घेऊन जुना जीर्ण झालेला मंडप पाडण्यात आला आहे. तर मंदिरासमोर असणारे हनुमान मंदिर काढण्यासाठी हा होमहवन आयोजित करण्यात आला होता.

पहाटे 5.30 वाजता दयानंद स्वामी, वैभव स्वामी, नागेश स्वामी, दीपक जंगम, शैलेश स्वामी, विनायक स्वामी यांच्या पौरोहित्याखाली होमहवन व पूजाविधी सुरु झाला. मंत्रपठणानंतर दुपारी 12 वाजता हा विधी संपला. विधी संपल्यानंतर ग्रामस्थांच्या सहयोगातून हनुमान मंदिर काढून मूर्तीची प्रतिष्ठापना काम पूर्ण होईपर्यंत बसवान मंदिर गाभाऱयात करण्यात आली.

नागदेवतेचे दर्शन

हा होमविधी करण्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संध्याकाळी तयारी सुरु होती. पूजाविधी मांडण्यात येत होता. याचवेळी या पूजाविधीच्या ठिकाणी येऊन नागरिकांना नागदेवतेने दर्शन दिले. मंदिरात अनेक वर्षापासून नागदेवता वास करते. हे अनेकांनी दर्शनातून अनुभवले आहे. बुधवारी संध्याकाळी मात्र पूजाविधीची तयारी सुरु असतानाच दिलेले दर्शन गावात चर्चेत होते. भाविकांनी याविषयी श्रद्धा जोपासली.