|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली सीमावासीयांची भूमिका

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली सीमावासीयांची भूमिका 

प्रतिनिधी /बेळगाव :

कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावासीयांनी घेतलेल्या महामेळाव्यात महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते. तुमची बाजू महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर तातडीने मांडेन, असा शब्द त्यांनी दिला होता. गुरुवारी त्यांनी तो शब्द पूर्ण केला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांच्याकडे सीमावासीयांचे भूमिका मांडणारे तीन पानी पत्र धनंजय मुंडे यांनी सादर केले. यामुळे सीमाभागात समाधान व्यक्त होत आहे.

धनंजय मुंडे यांनी देवेंद फडणवीस यांना दिलेल्या पत्रात बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील सुमारे साडेआठशे गावातील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारकडून होत असलेला अत्याचार, दडपशाही, मराठी भाषेवरील अन्याय व मुस्कटदाबीची गांभीर्याने दखल घेऊन सीमाभागातील मराठी जनतेला न्याय व महाराष्ट्रात सामील होण्याच्या त्यांच्या लढय़ाला पाठिंबा व बळ देण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चाधिकार समितीची बऱयाच काळापासून बैठक झालेली नाही. समन्वय समितीचीही बैठक नियमित होत नाही. या समितीच्या कुठल्याही पदाधिकाऱयाला सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट घेण्याची गेल्या चार वर्षात गरज वाटली नाही. समितीसोबत चर्चा झालेली नाही. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवेळी कर्नाटक राज्याचे मंत्री व सचिव दरवेळी जातीने उपस्थित असतात. मात्र, महाराष्ट्राचे मंत्री व सचिवांना त्यासाठी सवड मिळत नाही, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्र सरकारची सीमाप्रश्नी असलेली ही नकारात्मकता सीमाभागातील मराठी जनतेच्या मुळावर आली आहे, असा खेदही धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केला आहे.

कृपया वस्तुस्थितीची गांभीर्याने नोंद घेऊन सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी तसेच संयुक्त महाराष्ट्राचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी विनंतीही धनंजय मुंडे यांनी केली आहे. यासंदर्भात आवश्यक तो पाठपुरावा आपण सातत्याने करत राहू, असे त्यांनी समाजमाध्यमांद्वारे कळविले आहे.