|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जिल्हय़ासाठी आज चिकोडी बंद

जिल्हय़ासाठी आज चिकोडी बंद 

प्रतिनिधी /  चिकोडी :

 गत 30 वर्षांपासून प्रलंबित असलेला चिकोडी जिल्हा मागणी प्रश्नाच्या निकालासंदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दि. 14 रोजी चिकोडी जिल्हा मागणी आंदोलन समितीच्यावतीने चिकोडी बंदची हाक देण्यात आली आहे, अशी माहिती चिकोडी जिल्हा मागणी आंदोलनाचे नेते बी. आर. संगाप्पगोळ यांनी   दिली. या बंदच्या निमित्ताने शहरातील राज्य परिवहन मंडळाच्या बसेस, ऑटो रिक्षा आदी देखील बंद ठेवण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा मागणी आंदोलन समितीतर्फे करण्यात आली आहे. तत्पूर्वी गुरुवारी जिल्हा मागणीसाठी मुधोळ-निपाणी मार्गावर रास्ता रोको करुन आंदोलन छेडण्यात आले होते.

संगोप्पगोळ पुढे म्हणाले, चिकोडी जिल्हा संदर्भात बेळगाव जिल्हय़ातील काही नेत्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळेच हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. सध्या बेळगाव येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर चिकोडी शहरासह उपविभागातील विविध ठिकाणाहून अनेक संघटनांचे प्रतिनिधी येणार आहेत. दरम्यान सकाळी 9.30 पासून या बंदला प्रारंभ होणार आहे.  चिकोडी उपविभागातील रोज एक शहर बंद करण्यात येत आहे. याचाच एक भाग आहे. या बंदला चिकोडीतील सर्व संघ-संस्था, बँका, शैक्षणिक दालने, व्यापारी संघटना, कन्नड संघटना, वकील संघटना, रयत संघटना आदींनी उत्स्फुर्तपणे पाठिंबा व्यक्त केला आहे. चिकोडी शहरातील विविध संघटना, शैक्षणिक दालनांचे विद्यार्थी, आंदोलनकर्ते तसेच जिल्हा मागणीप्रेमी सार्वजनिक आदींद्वारे पदयात्रेचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे संगाप्पगोळ यांनी सांगितले.

चोख पोलीस बंदोबस्त

बंदच्या पार्श्वभूमिवर गुरुवारी चिकोडी शहरात शहरवासियांना चिकोडी बंदला साथ देण्याविषयी स्पिकरद्वारे सर्व प्रभागात आवाहन करण्यात आले आहे. या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. बंदच्या पार्श्वमिवर चिकोडी शहरात पोलीस खात्याद्वारे चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बंदची तीव्रता ओळखून चिकोडी आगारातून होणाऱया बस फेऱया वरिष्ठांच्या आदेशानुसार बंद होण्याची शक्यताही आगार प्रमुखांनी व्यक्त केली आहे.