|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कराड पालिका चालणार सौर ऊर्जेवर

कराड पालिका चालणार सौर ऊर्जेवर 

देवदास मुळे /कराड :

कराड शहरात सर्व पथदिवे बदलून एलईडी दिवे लावण्याच्या कामास लवकरच प्रारंभ होणार आहे. आता राज्य शासनाच्या ऊर्जा विकास अभिकरणकडून 10 किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प 100 टक्के अनुदान स्वरूपात नगरपालिकेस भेट देण्यात आला आहे. गुरूवारी नगरपालिकेच्या जुन्या इमारतीवर सौर ऊर्जेची संयत्रे बसवण्यास प्रारंभ झाला. या प्रकल्पामुळे नगरपालिकेस लागणाऱया संपूर्ण विजेची बचत होणार असून सौर ऊर्जेच्या प्रकाशात आता पालिकेचा कारभार चालणार आहे.

कराडमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या रोहिणी शिंदे या निवडून आल्यानंतर राज्य सरकारने निधीच्या बाबतीत नगरपालिकेवर मेहेरनजर ठेवली आहे. त्यामुळे सर्वप्रथम कराड पालिकेस सौर ऊर्जेचा प्रकल्प देण्यात आला आहे. यामुळे नगरपालिकेच्या जुन्या व नव्या इमारतीतील वीज वापराचे प्रत्येक महिन्याला येणारे सुमारे 40 ते 50 हजार रूपयांचे वीज बिल वाचणार आहे.

कराड नगरपालिकेची वीज बचत व्हावी, यासाठी पवनचक्कीपासून सौर ऊर्जेच्या वापरापर्यंत अनेक चर्चा यापूर्वी झाल्या होत्या. मात्र यातील कोणताही निर्णय फळास गेला नव्हता. शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये होणारा वीज वापर वाचवण्यासाठी राज्य शासनाने 2013 साली अपारंपरिक ऊर्जेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका या शासकीय, निमशासकीय इमारतींवर सौर ऊर्जा संच बसवण्याची योजना आखली होती. त्यानुसार ऊर्जा विकास अभिकरणने कराड पालिकेस 100 टक्के अनुदान योजनेवर असणाऱया या प्रकल्पाचा लाभ घेण्याबाबत पत्र दिले होते.