|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » लूटमार, चेनस्नेचिंग करणारे दोघेजण गजाआड

लूटमार, चेनस्नेचिंग करणारे दोघेजण गजाआड 

प्रतिनिधी /सातारा :

फिरायला गेलेल्या जोडप्यांना, युवकांना रस्त्यात अडवून त्यांना लुटणाऱया तसेच मेढा परिसरात चेनस्नेचिंगचे तीन गुन्हे दाखल असलेले आरोपी आकाश उर्फ चेतन संभाजी जाधव (वय 20 रा. ढगेवाडी, ता. माण) व त्याचा साथीदार विजय बापू मदने (वय 23 रा. मलवडी, ता. माण) या दोघांना सातारा तालुका पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केले. गेले वर्षभरापासून पोलीस त्यांच्या मागावर होते.

मेढा परिसरात तसेच सातारा परिसरात निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेलेल्या जोडप्यांना तसेच युवकांना रस्त्यात अडवून व शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱया टोळीच्या मागावर पोलीस गेल्या वर्षभरापासून होते. तसेच याच आरोपींनी मेढा परिसरात तीन महिलांचे मंगळसुत्रे हिसकावून पोबारा केला होता. याबाबत पोलिसांना गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आकाश उर्फ चेतन जाधव व विजय मदने यांच्या मागावर होते. परंतु हे अट्टल सराईत गुन्हेगार पोलिसांना वारंवार चकवा देत होते.

गुरुवारी दुपारी आकाश उर्फ चेतन हा ढगेवाडी (ता. माण) येथे घरी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी नारायण गिते, सहाय्यक फौजदार वाकडे, पी. सी. पोरा, एल. सी. मुलाणी, सी. सी. मोरे यांनी त्याच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपला साथीदार विजय मदने याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्यालाही तत्काळ अटक केली. या दोघांना पोलिसांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सूरज सोनमळे व सत्यजित कदम हे दोन युवक फिरायला गेले असताना त्यांची दुचाकी गाडी अडवून सोन्याचे ब्रेसलेट, अंगठी, 5 हजार रुपयांची रोकड व दुचाकी गाडी अशी लूटमार केल्याची कबुली दिली. तसेच मेढा परिसरात झालेल्या चेनस्नेचिंगच्या तीन घटनांमध्ये आपला सहभाग असल्याचेही कबूल केले.