|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बायोमायनिंग मशिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

बायोमायनिंग मशिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू 

वार्ताहर /कराड :

rयेथील नगरपालिकेच्या बाराडबरे येथे सुरू असलेल्या बायोमायनिंग मशिनच्या बेल्टमध्ये हात अडकल्याने मशिनमध्ये अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला. अतुल रमेश कावडे (वय 27 रा. चांदोरी बुद्रुक, जि. गोंदिया) असे मयत कामगाराचे नाव आहे. गुरूवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची नोंद शहर पोलिसांत झाली आहे.

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिकेचा बाराडबरे येथे कचरा डेपो आहे. येथील कचऱयाचे बायोमायनिंग करण्याचे कंत्राट पुणे येथील ठेकेदाराला देण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अवाढव्य मशिनच्या माध्यमातून डेपोवर कचऱयाचे बायोमायनिंग करण्यात येत आहे. ठेकेदाराने एकुण सहा कर्मचारी येथे नेमले होते.

गुरूवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास बायोमायनिंग मशिन सुरू होते. दिवसातून चार ते पाच वेळा मशिन बंद करून बेल्टमधील कचरा काढावा लागतो. मात्र मशिनवरील चालक पाणी पिण्यासाठी खाली उतरला असतानाच अतुल कावडे याने बेल्टमधील कचरा काढण्यासाठी हात मशिनमध्ये घातला. मात्र मशिन सुरूच असल्याने अतुलचा हात बेल्टमधून आत ओढला गेला. हाताबरोबरच अतुलही आत ओढला गेला. यावेळी त्याच्या हातासह डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरसेवक महेश कांबळे, प्रीतम यादव, आरोग्य निरीक्षक मिलिंद यांच्यासह पालिका कर्मचाऱयांनी तातडीने कचरा डेपोवर धाव घेतली. घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. अतुलच्या नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. बाराडबरे परिसरात ही घटना वाऱयासारखी पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.