|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » संगीत नाटकांनी दिला मराठी रंगभूमीला सुवर्णकाळ!

संगीत नाटकांनी दिला मराठी रंगभूमीला सुवर्णकाळ! 

जामसंडेत मराठी रंगभूमी दिन, नाटय़गीत कार्यक्रम

वार्ताहर / देवगड:

मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ हा संगीत नाटकांमुळे यशोशिखरावर पोहोचला होता. त्याकाळात नाटय़पदांना दर्जेदार संगीत व अभ्यासू गायकांची साथ लाभली होती. सामाजिक विषयांची हाताळणी, प्रबोधन व मनोरंजन असा उद्देश नाटकांच्या सादरीकरणामध्ये असला, तरी थकल्या मनाला विश्रांतीची फुंकर घालण्याचे काम या मराठी रंगभूमीने केले होते. हा इतिहास आजही रसिकांच्या मनात अभिमानाने फुलत आहे, असे उद्गार तालुका ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष अरुण सोमण यांनी व्यक्त केले. दरम्यान, यावेळी नाटय़गीत गायन कार्यक्रम पार पडला.

जामसंडे येथील टिळक स्मारक येथे देवगड तालुका ब्राह्मण मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी रंगभूमी दिन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारविजेते संतोष वालावलकर, जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका प्रतीक्षा जाधव आदी उपस्थित होते. मराठी रंगभूमी खऱया अर्थाने इ. स. 1843 मध्ये सांगली येथे उदयास आली. तेथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे कै. विष्णूदास भावे यांनी 5 नोव्हेंबर 1843 साली सांगली येथे ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, करमणूक प्रधान, रहस्यमय असे विविध प्रकार रंगभूमीने हाताळले असून हे मराठी भाषेला भूषणावह आहे, असेही सोमण यांनी सांगितले. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त वालावलकर व सौ. जाधव यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

बहारदार नाटय़गीत कार्यक्रम

उद्घाटनानंतर तालुक्यातील कलाकारांनी नाटय़गीताचा बहारदार कार्यक्रम सादर केला. यात सुप्रसिद्ध गायक प्रसाद शेवडे, कु. सावनी शेवडे, उदय प्रभूदेसाई, डॉ. मधुसूदन सोमण, कु. सुधांशु सोमण, दत्ता किरकिरे, अक्षय जांभळे, गजानन गदे, विनायक ठाकुर, सरिता दामले यांनी नाटय़गीत गायन केले. त्यांना प्रथमेश बोंडाळे, रमेश गोंधळी, संदीप फडके, समीर सोमण यांनी तबलासाथ, दत्ता मराठे, प्रकाश मराठे, प्रसाद शेवडे, अरुण सोमण यांनी हार्मोनियम व ऑर्गनसाथ तर विद्याधर ठाकूर यांनी व्हायोलिनसाथ केली. सूत्रसंचालन संजय गोगटे यांनी केले.