|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चौपदरीकरण ठेकेदाराची मनमानी नको!

चौपदरीकरण ठेकेदाराची मनमानी नको! 

वागदे सरपंचांचा ग्रामस्थांसह आंदोलनाचा इशारा

कणकवली:

महामार्ग चौपदरीकरण कामामध्ये ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱयांकडून मनमानी पद्धतीने काम केले जात असल्याने वागदे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. चौपदरीकरणात संपादित होणाऱया जमिनीची नोटीस अथवा भूसंपादन मोबदला दिलेला नसतानाही त्या क्षेत्रातील झाडे तोडली जात आहेत. वारंवार अधिकाऱयांना कल्पना देऊनही मनमानी पद्धतीने काम होत आहे. ही मनमानी न थांबल्यास येत्या चार दिवसांत ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वागदे सरपंच सौ. पूजा उमेश घाडीगावकर यांनी दिला आहे.

महामार्ग चौपदरीकरणाचे काम वागदे गावच्या हद्दीत सुरू झाल्यानंतर ज्या जमीनधारकांना नोटिसा मिळालेल्या नाहीत, त्यांना तातडीने नोटिसा दिल्या जातील. 15 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे ठेकेदार कंपनीचे अधिकारी रवीकुमार यांनी 16 ऑगस्टच्या ग्रामसभेत उपस्थित राहून सांगितले होते. मात्र, त्यानंतर काम सुरू करताना स्थानिक ग्रामस्थ अथवा ग्रा.पं. पदाधिकाऱयांना विश्वासात घेतलेले नाही. गावातील सुमारे 60 टक्के ग्रामस्थांना भूसंपादनाविषयी नोटीस मिळालेली नाही. तरीही ठेकेदार कंपनीकडून परस्पर झाडे तोडणे, मातीचा भराव टाकणे आदी कामे केली जात आहेत, असेही घाडीगावकर म्हणाल्या.

चौपदरीकरण ठेकेदार कंपनी ग्रामपंचायतीला कोणतीही सूचना न देता परस्पर काम करीत आहे. मालकी हक्काची जागा असतानाही रात्री त्यातील झाडे तोडून मातीचा भराव टाकला जात आहे. गेले काही दिवस हा प्र्रकार सुरू असून महामार्ग प्राधिकरणचे अभियंता प्रकाश शेडेकर तसेच दिलीप बिल्डकॉनचे अधिकारी यांना संपर्क साधूनही हे प्रकार सुरूच आहेत. म्हणूनच यावर येत्या चार दिवसांत उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा घाडीगावकर यांनी दिला आहे..

Related posts: