|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सुवर्णसौध आंदोलनस्थळी आंदोलकांचा ठिय्या सुरुच

सुवर्णसौध आंदोलनस्थळी आंदोलकांचा ठिय्या सुरुच 

यंदा शिक्षक-शेतकऱयांची अधिक आंदोलने

प्रतिनिधी/ बेळगाव

यावषीच्या अधिवेशनावेळी सर्वात जास्त आतापर्यंत शिक्षक व शेतकरी संघटनांनीच अधिक आंदोलने छेडली आहेत. नोकरी कायमस्वरुपी सामावून घ्या, पेन्शन लागू करा, शाळांना अनुदान द्या यासह इतर मागण्यांसाठी शिक्षकांनी आंदोलन छेडले आहे. तर शेतकरी ऊस बिल, ऊस दर, दुष्काळाचा तोडगा, पाणी समस्या यासाठी आंदोलन छेडले आहे. याचबरोबर विविध कंत्राटी पद्धतीने काम करणाऱया कर्मचाऱयांनीही आंदोलनस्थळी ठाण मांडले आहे. शुक्रवारीही सात संघटनांनी आपले आंदोलन सुरू ठेवले होते.

महाविद्यालयांना अनुदान द्या

विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी वेगवेगळय़ा शिक्षणाची महाविद्यालये सुरू करण्यात आली. पीयुसी, आयटीआय, जेओसी, डिप्लोमा व इतर अभ्यासक्रमाची महाविद्यालये सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली. त्यामध्ये गेली अनेक वर्षे आम्ही विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करत आहे. मात्र या महाविद्यालयांना अनुदान देण्यात आले नाहीत. त्यामुळे 3 हजारांहून अधिक जण आम्ही बेरोजगार झालो आहे.

या महाविद्यालयांचा समावेश एनसीव्हीटीमध्ये करावा. त्यामुळे शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांचेही भविष्य घडेल, असे या निवेदनात म्हटले आहे. महाविद्यालयांना अनुदान नसल्यामुळे आम्हाला केवळ संस्था वेतन देईल तेवढय़ावरच समाधान मानावे लागत आहे. जर संस्थेला अनुदान मिळाले तर साऱयांचाच विकास होईल, असे या निवदेनात म्हटले आहे.

काही महाविद्यालयांना अनुदान दिले तरी त्या ठिकाणी शिक्षक भरण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करावा आणि महाविद्यालयांना अनुदान द्यावे, असे म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मंजुनाथ, उपाध्यक्ष आडवेश इटगी, डॉ. नारायण्णाप्पा, विरेश बोनकर, प्रसाद चौगुले यांच्यासह शिक्षक व प्राध्यापक उपस्थित
होते.

केईबी, हेस्कॉम कंत्राटी कर्मचाऱयांचे आंदोलन

केईबी व हेस्कॉममध्ये गेली 10 ते 15 वर्षे आम्ही काम करत आहे. मात्र आम्हाला तुटपुंजे वेतन दिले जात आहे. जवळपास आम्ही सहा हजारांहून अधिक जण या दोन्ही विभागांमध्ये काम करत आहे. आमच्यामुळे या दोन्ही विभागांचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून आम्हाला नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्यावे, अशी मागणी या   निवेदनात करण्यात आली आहे.

हेस्कॉम व केईबीमध्ये ऑपरेटर, हेल्पर्स, लाईनमन म्हणून आम्ही काम करत आहे. आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनामध्ये संपूर्ण राज्यातील कंत्राटी कर्मचाऱयांनी भाग घेतला होता. यावेळी एन. एस. विरेश, गंगाधर बडगेर, एस. एम. शर्मा, निर्मलराव, शिवराज, नागराज यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

बेडर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये

समावेश करण्याची मागणी

बेडर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन छेडले. आम्हाला राखीवता नसल्यामुळे आमच्या समाजावर अन्याय झाला आहे. आम्ही बेडर असून देखील आम्हाला सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाल्मिकी समाज म्हणून ओळखले गेले तरी अजूनही काही पोट जातींना अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आला नाही. आम्हाला किमान 7.5 टक्के आरक्षण द्यावे. त्यामुळे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती सुधारेल, असे या निवेदनात म्हटले आहे. आंदोलनस्थळी महिलांनी मोठी गर्दी केली होती. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी रेणूका कुंडेद, सिद्धयण्णावर, सुरेश मुरगोड, महादेव बेग्यानट्टी, राघु पुजेरी यांच्यासह बेळगाव, सौदत्ती, बैलहोंगल आदी तालुक्मयातील बेडर समाजातील महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा

ठेवीदारांची पुंजीसाठी धडपड

क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा ठेवीदारांनी आता सुवर्णसौधसमोर ठेव परत मिळण्यासाठी आंदोलन छेडले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे ठेवीदार आपल्या आयुष्याच्या पुंजीसाठी धडपडू लागले आहेत. मात्र त्यांच्याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता या ठेवीदारांनी सुवर्णसौधकडे धाव घेतली आहे. संगोळ्ळी रायण्णा, भीमांबिका या सोसायटींमध्ये मोठय़ा प्रमाणात अनेकांनी ठेवी ठेवल्या. मात्र त्या ठेवी परत देण्यास सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पुगोळ यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र केवळ अटक करून इतर कारवाई त्यांच्यावर करण्यात आली नाही. त्यामुळे आमची रक्कम मिळण्यास तयार नाही. त्यामुळे योग्य तो क्रम घ्यावा आणि आम्हाला रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.

कृषी सहाय्यकांचा ठिय्या

कृषी विभागात काम करण्याची संधी देतो म्हणून कृषी महाविद्यालय सुरू करून त्या ठिकाणी आम्हाला शिक्षण दिले. त्यानंतर काही दिवस कृषी खात्याच्या माध्यमातून काम दिले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कामच देण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही बेरोजगार पडलो आहे. तरी आम्हाला सरकारने कृषी विभागामध्ये सामावून घ्यावे, अशी मागणी तरुणांनी केली आहे. सुवर्णसौध आंदोलनस्थळी ठिय्या आंदोलन छेडून जोरदार घोषणाबाजी ते तरुण करत होता. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आम्हाला सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. याचबरोबर मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि मंत्री भैरेगौडा यांनीही आम्हाला आश्वासने दिली. मात्र निवडणूक झाल्यानंतर या सर्वांनीच आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असून तातडीने कृषी सहाय्यक म्हणून नेमणूक करून घ्यावी, अशी मागणी या तरुणांनी निवेदनाद्वारे केली आहे.

बळ्ळारी येथील खाण उद्योग कामगारांचे आंदोलन

बळ्ळारी येथील खाण उद्योग पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे आम्ही बेरोजगार झालो आहे. त्यामुळे पुन्हा खाण उद्योग सुरू करावा, अशी मागणी कामगारांनी केली आहे. के. के. कोप्प येथे आंदोलनस्थळी ठिय्या आंदोलन करून या कामगारांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. बळ्ळारी येथे खाण उद्योग मोठय़ा प्रमाणात सुरू होता. त्यामुळे सर्वांनाच रोजगार उपलब्ध होत होता. बळ्ळारी जिल्हाच नाही तर राज्यातील इतर जिह्यांतील कामगारांनाही काम मिळत होते. मात्र आता हा खाण उद्योग पूर्ण बंद झाला आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तातडीने पूर्वीप्रमाणेच खाण उद्योग सुरू करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.शुक्रवारीही तब्बल 7 संघटनांनी आंदोलन छेडले होते. त्यामुळे गर्दी झाली होती. मात्र शुक्रवारच्या आंदोलनांमध्ये आंदोलकांची संख्या गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसत होते. असे असले तरी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची तपासणी करूनच त्यांना आंदोलनस्थळी पाठविले होते. एकूणच आंदोलकांची संख्या वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे.

 

Related posts: