|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका

आंध्र, तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका 

वृत्तसंस्था/ चेन्नई

पुढील दोन दिवसांत आंध्रप्रदेश आणि उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागामध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात उच्च दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून यामुळे 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच या वाऱयाचे रुपांतर चक्रीवादळात होऊन किनारपट्टीला आदळण्याची शक्यता वर्तवली. याशिवाय पुढील दोन दिवसांमध्ये या दोन्ही राज्यात मुसळधार पाऊस होण्याचाही अंदाज दिला आहे.

हवामान खात्याने याबाबत निवेदन प्रसिद्ध केले असून आंध्र प्रदेश, उत्तर तामिळनाडू, पाँडिचेरीच्या किनारी भागात ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. दक्षिण-पूर्व भागात उच्च दबाव क्षेत्र निर्माण झाले असून ते उत्तर-पूर्व दिशेने जात आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासात शनिवार आणि रविवारच्या दरम्यान चक्रीवादळ सक्रीय होऊ शकते. सोमवारी दुपारनंतर या वाऱयाचा वेग कमी होईल. त्यानंतर आंध्रप्रदेशची सीमा ओलांडून जाईल, असे म्हटले आहे. या कालावधीत वाऱयाचा वेग वाढून 80 ते 90 किलोमीटर प्रतितासापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. स्थानिक नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

……………..