|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » प्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात

प्रतिज्ञापत्रातील बदलाबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात 

राफेलप्रकरणी विनंती : कॅग, पीएसीला अहवाल देण्याचा मुद्दा बदलण्याची मागणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलासा दिला असला तरी प्रतिज्ञापत्रातील कॅग व पीएसीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा वादाचा भडका उडाला आहे. केंद्र सरकारने या मुद्यावर बदल करण्याचा मागणी अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. तर यावरून विरोधकांनी विशेषतः काँग्रेसने केंद्र सरकारवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे. केंद्र सरकारने न्यायालयाला खोटा अहवाल, प्रतिज्ञापत्र दिल्याचा आरोप केला जात आहे.

केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रामध्ये राफेल खरेदी प्रकरणाचा अहवाल कॅग आणि लोकलेखा समितीमध्ये (पीएसी) देण्यात आल्याचे म्हटले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये कोणतीही अनियमितता आणि भ्रष्टाचार झाला नसल्याचे सांगत व्यवहार योग्य असल्याचे सांगून केंद्र सरकारला दिलासा दिला होता. तथापि शनिवारी या प्रतिज्ञापत्रातील कॅग व पीएसीला अहवाल सादर केल्याच्या मुद्यावरून पुन्हा एकदा घमासान सुरु झाले आहे. काँग्रेसने आरोप केल्यानंतर सरकारने पुन्हा न्यायालयात धाव घेत संबंधित ओळी बदलण्याबाबत विनंती अर्ज दिला आहे. टंकलेखनातील चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे या अर्जात नमूद केले आहे. याआधी कॅग व पीएसला अहवाल दिल्याचे म्हटले होते. तसेच या दोन्ही संस्थांनी याबाबत समीक्षणही केल्याचे नमूद होते. तथापि शनिवारच्या अर्जामध्ये सरकारने या संस्थांकडे केवळ अहवाल देण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे नमूद करावे, असे म्हटले आहे. टंकलेखनामधील चुकांमुळे हा प्रकार घडला असून त्यात दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे.