|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत

इंग्लंड नमवून बेल्जियम पहिल्यांदाच अंतिम फेरीत 

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमने नवा इतिहास घडविताना पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. शनिवारी झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य लढतीत बेल्जियमने इंग्लंडचा 6-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.

या सामन्यात इंग्लंडकडून फारसा प्रतिकार पाहवयास मिळाला नाही. बेल्जियमतर्फे ऍलेक्सझांडेर हेंड्रिक्सने 45 व्या आणि 50 व्या मिनिटाला हे दोन गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविले. टॉम बूनने आठव्या मिनिटाला, सिमॉन गोनॉर्डने 19 व्या मिनिटाला तर सेड्रिक चार्लरने 42 व्या मिनिटाला तसेच सेबेस्टियन डॉकेरने 53 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदविले. 2014 साली हॉलंडमध्ये झालेल्या यापूर्वीच्या पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत बेल्जियमने पाचवे स्थान मिळविले होते. मात्र यावेळी बेल्जियमने प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला. शनिवारच्या पहिल्या उपांत्य सामन्यात मध्यंतरापर्यंत बेल्जियमच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व राखताना गोल करण्याच्या संधी गमविल्या नाहीत. आठव्या मिनिटाला बूनने तर 19 व्या मिनिटाला गोनॉर्डने मैदानी गोल करून बेल्जियमला मध्यंतरापर्यंत 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. 20 व्या मिनिटाला इंग्लंडला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला तर सातव्या मानांकित इंग्लंडने ही संधी गमविली. बेल्जियमच्या गोलरक्षकाची कामगिरी अधिक भक्कम झाली. सामना संपण्यास केवळ 2 मिनिटे बाकी असताना इंग्लंडला दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले पण त्यांना शेवटपर्यंत या सामन्यात आपले खाते उघडता आले नाही. इंग्लंडला हा उपांत्य सामना एकतर्फी गमवावा लागला.