|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » लक्ष्मण मानेंच्या घरासमोर मराठा तरुणांची गांधीगिरी

लक्ष्मण मानेंच्या घरासमोर मराठा तरुणांची गांधीगिरी 

लेखी माफीनाम्यानंतर आंदोलन घेतले मागे

प्रतिनिधी/ सातारा

पाटील घरण्याबाबत केलेला उल्लेख मराठा समाजाला खटकल्यामुळे पद्मश्री लक्ष्मण माने यांच्याविरोधात सोशल मीडियावर टीकेचा भडीमार सुरू आहे. त्यामुळे शनिवारी साताऱयात माने यांनी पत्रकार परिषद त्यांच्या निवास्थानी घेतली. त्यावेळी मराठा समन्वयक मोर्चाच्या काही सदस्यांनी त्यांच्या घरासमोर उभे राहून गांधीगिरी पद्धतीने निदर्शने केली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. लक्ष्मण माने यांनी लेखी माफीनामा सादर केल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले.

    शनिवारी दुपारी बारा वाजता पद्मश्री लक्ष्मण माने यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी दुपारी पत्रकार त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पत्रकार परिषद सुरू असतानाच मराठा समाजातील बापू शिरसागर, संदीप पोळ, शरद जाधव, संदीप नवघणे, साईराज कदम, तेजस कदम, आकाश साबळे, शिवाजीराव काटकर यांनी पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र शब्दांत निषेध सुरू केला. गांधीगिरी पद्धतीने त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी तत्काळ शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनाही माहिती समजताच पोलीस फौजफाटय़ासह ते लक्ष्मण माने यांची निवासस्थानी दाखल झाले. मराठा समाजातील युवक शांत पद्धतीने संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते, परंतु लक्ष्मण माने हे त्यांच्या घरातून बाहेर पडले नाहीत. त्यांनी उपस्थित मराठी तरुणांना लेखी माफीनामा लिहून सादर केला. त्यानंतर पोलिसांनी हा माफीनामा या तरुणांना दिल्यानंतर ही मंडळी तेथून निघून गेली व वातावरण शांत झाले.

   दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण माने म्हणाले, सोशल मीडियाने माझा बकरा केला आहे. मी स्त्रियांचा सर्वाधिक सन्मान करणारा माणूस आहे. या स्त्रियांच माझ्या अंगावरती घालून माझी बदनामी करण्याचा कट न्यायालयात उघड झाला, मी निर्दोष मुक्त झालो. आता हे तमाशा कलावंतांच्या निमित्ताने पुन्हा स्त्रियांच्या प्रश्न आणून मला बदनाम करण्याचा हितशत्रूंचा कोण आहे. तसेच मी माझ्या भाषणात मराठा हा शब्द वापरलेला नाही तरीही सोशल मीडियांनी माझा बकरा केला. मी जे म्हणालो नाही ते माझ्या नावाने व्हायरल करण्यात आले. मी बोललो की नाही याची कसलीही खातरजमा न करता किंवा मला न विचारता सोशल मीडियाने माझ्याविरुद्ध आघाडी उघडली. त्यामुळे ज्या भावंडांच्या भावना दुखावली असतील मनात प्रक्षोभ निर्माण झाला असेल, त्यांना पुन्हा नम्रपणे सांगतो मी कोणाच्या जातीचा उल्लेख केलेला नाही, तरीही जे बांधव माझ्यावरती चिडलेले आहेत, भगिंनी चिडल्या आहेत. त्यांच्या प्रति मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी त्यांनी कबूली दिली.

  याबाबत आपण माननीय जिल्हाधिकारी व सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सविस्तर म्हणणे दिले आहे. ज्या-ज्या मित्रांनी माझ्या जीवाला धोका निर्माण केला, मला रोज ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत यासाठी जे मित्र जबाबदार आहेत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करणार आहे. या दिलगिरीनंतर समाजातील सर्व बांधवांनी या क्रिया-प्रतिक्रिया थांबवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.