|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाजपकडून संदेश 

सतीश धोंड, विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत बैठक

प्रतिनिधी/ पणजी

गोव्याच्या संघटनमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गोव्यात दाखल झालेल्या सतीश धोंड यांच्या उपस्थितीत भाजपच्या विविध शाखांच्या पदाधिकाऱयांची बैठक शनिवारी घेण्यात आली. गोव्याचे पालक संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासह गाभा समिती पदाधिकारी यांचीही बैठकीला उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा मंत्र या बैठकीत देण्यात आला.

लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघ्या महिन्यांचा कालावधी बाकी असून आता निवडणुकीच्या तयारीला लागा असा संदेश या बैठकीतून देण्यात आला. युवा विभाग, महिला विभाग, अल्पसंख्यांक विभाग व अन्य विभाग प्रतिनिधींची या बैठकीला उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून विविध मतदारसंघातील बैठका, सभा यांचा आराखडाच तयार करून या प्रतिनिधीला देण्यात आला आहे.

महिला विभाग सक्षम करणार

महिला विभाग सक्षम बनविण्यावर सध्या भर देण्याचा विचार भाजपने चालविला आहे. मागील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतल्यानंतर महिला मतदारांच्या बाबतीत कमी पडल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आता महिला विभाग सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. महिला पदाधिकाऱयांना गुजरातलाही पाठविण्यात येणार आहे.

दिल्लीत अमित शहांच्या बैठकीला उपस्थिती

दिल्लीत अमित शहा यांच्या बैठकीला गोव्यातून 60 कार्यकर्ते उपस्थिती लावतील. लोकसभा निवडणुकीबाबत भाजप गंभीर असून उत्तर व दक्षिण गोवा  संघटना सक्रिय करण्याच्या दृष्टीने आता मोठे प्रयत्न सुरू झाले आहेत.

मोदींच्या उपस्थितीत महामेळावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लवकरच एक महामेळावा पणजीत घेतला जाणार आहे. मेळाव्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. या मेळाव्याची मोठी तयारी भाजप करणार आहे.

धोंड यांचे पक्षातील वजन वाढले

2017 च्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसलेल्या भाजपचे संघटनात्मक कार्य काही प्रमाणात मंदावले होते. त्यामुळे महासंघटनमंत्री सतीश धोंड यांना पुन्हा गोव्यात आणण्याची पाळी भाजपवर आली. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीच हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सतीश धोंड यांचे पक्षातील वजन बऱयाच प्रमाणात वाढले आहे.

शिरोडकर व सोपटेंसोबत बैठक

काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून हल्लीच भाजपात दाखल झालेले माजी आमदार सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांच्यासोबत गाभा समिती सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत मतदारसंघातील कार्याबाबत चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीबरोबरच गोव्यात दोन मतदारसंघांची पोटनिवडणूक होण्याची शक्यता असल्याने शिरोडा, मांद्रे या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत सध्या भाजप गंभीर आहे.

पराभवामुळे भाजप सतर्क

हल्लीच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या महत्त्वाच्या तीन राज्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्याने भाजप पक्ष आता सतर्क झाला आहे. त्यामुळे गोव्यातील लोकसभा निवडणुकीची तयारी सध्या गांभीर्याने सुरू आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचा परिणाम गोव्यात होऊ नये याची काळजी भाजप घेत असून त्यासाठी संघटना मजबुतीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे.