|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित होणार 

गोवा विद्यापीठ पदवीदान सोहळ्य़ात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती

प्रतिनिधी/ पणजी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच निश्चित केले जाणार असून शैक्षणिक क्षेत्राला एक नवी दिशा मिळणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोवा विद्यापीठाच्या 31 व्या पदवीदान सोहळ्य़ात बोलताना सांगितले. शिक्षणामध्ये दर्जेदारपणा, संशाधन आणि बदल हे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात झालेल्या दिक्षांत सोहळ्य़ाला विद्यापीठाच्या कुलगुरु मृदूला सिन्हा, उपकुलगुरु डॉ. वरुण साहनी, व्ही. व्हाय. रेड्डी अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. विविध विषयामध्ये पीएचडी केलेल्या तसेच डॉक्टरेट मिळविलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली तर प्रो. बी. शेख अली यांना डिलीट पदवी बहाल करण्यात आली. त्याचबरोबर राय मनोरा येथील व्ही. एम. साळगावकर कॉलेज ऑफ इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीला स्वच्छता पुरस्कार प्राप्त झाला.

शिक्षणाच्या दर्जाबाबत केंद्र सरकार गंभीर असून दर्जेदार शिक्षणावर केंद्र सरकार भर देत आहे. शिक्षणाला दर्जा नसेल तर त्या शिक्षणाला महत्त्व नाही. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आता लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित केले जाणार आहे. लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षक विद्यादानाचे काम करीत आहेत. 1.65 लाख कोटी पुस्तके उपलब्ध आहेत. संगणकावरही ही पुस्तके सहजपणे उपलब्ध होतात.

शैक्षणिक धोरण निश्चित झाल्यानंतर त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. 2000 अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. साधनसुविधा निर्मिती हवीच पण दर्जेदार शिक्षण कसे देता येईल व त्याची फलनिष्पत्ती काय होईल हे महत्त्वाचे आहे. शिक्षण क्षेत्रात कोणत्या समस्या आहेत त्यावर अभ्यास करायला हवा. इयत्ता आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. मात्र आता त्यावर फेरविचार होऊ शकेल व परीक्षाही घेतल्या जातील, असेही ते म्हणाले. चांगला समाज निर्माण होण्यासाठी चांगले शिक्षण हवे, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही वाटते.

छोटय़ा विद्यापीठाचा वेगळा गट

देशातील छोटय़ा विद्यापीठांचा वेगळा गट होणे आवश्यक आहे. तसा विचार व्यक्तही करण्यात आला आहे. त्यामुळे त्यावरही विचार होईल, असेही ते म्हणाले. गोवा विद्यापीठाबाबत त्यांनी गौरवोद्गार काढले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विद्यापीठाबाबत केलेल्या कार्याचाही त्यांनी गौरव केला. 53 टक्के विद्यार्थिनीना पदव्या प्राप्त झाल्या ही गौरवास्पद बाब असल्याचेही ते म्हणाले.

उच्च शिक्षणात गोव्याची प्रगती : राज्यपाल

गोव्याने शिक्षणाच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः उच्च शिक्षणात गोव्याने मोठी प्रगती केल्याचे गोवा विद्यापीठाच्या कुलगुरु व राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सांगितले. गोव्यात एकमेव विद्यापीठ आहे. मागील अडीच दशकात या विद्यापीठाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. राष्ट्रीय मुल्यांकनातही ‘अ’ श्रेणी दर्जा प्राप्त झाला आहे. मागील चार वर्षात काही नवीन गोष्टींचा समावेशही झाला आहे. अनेक चांगले उपक्रमही राबविले जात आहेत. गोव्याची लोकसंस्कृती उच्च वर्गाची आहे. सर्व जाती, धर्मांचे लोक एकोप्याने व शांततेत जगतात. गोवा आपल्या विशिष्ठ कलांसाठी ओळखले जाते. यावेळी त्यांनी पाच वचनांच्या पुर्ततेबाबत विद्यार्थ्यांकडून वचन घेतले.

विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. वरुण साहनी यांनी गोवा विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला. जागतिक मान्यता प्राप्त असलेले हे विद्यापीठ आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची अनुपस्थिती जाणवल्याचेही त्यांनी सांगितले. मेहनत, हिंमत आणि प्रामाणिकपणा याच्या आधारे ध्येय साध्य करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.