|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उत्तर कर्नाटकातील समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच

उत्तर कर्नाटकातील समस्येकडे सरकारचे दुर्लक्षच 

प्रतिनिधी/ बेळगाव 

उत्तर कर्नाटकाचा विकास, पाणी प्रश्न, शेतकऱयांच्या समस्या, दुष्काळी परिस्थिती यासह या भागातील ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारवतीने दरवर्षी येथील सुवर्ण विधानसौधमध्ये हिवाळी अधिवेशन भरविण्यात येत आहे. यंदाही दि. 10 डिसेंबरपासून या ठिकाणी अधिवेशन सुरू आहे. मात्र, शुक्रवारपर्यंत चाललेल्या अधिवेशनाच्या एकंदरीत कामकाजावरून राज्य सरकारला उत्तर कर्नाटकातील समस्यांबाबत कोणतीच काळजी नसल्याचे दिसून आले आहे.

विधानपरिषद सभागृहात मागील आठवडय़ात झालेल्या कामकाजात उत्तर कर्नाटकातील ज्वलंत विषय क्वचितच मांडण्यात आले. य्ािं विषयांवर दीर्घ चर्चाच झाली नाही. यावरून सभागृहातील सदस्यांना तसेच मंत्रिमहोदयांना या भागातील समस्यांविषयी किती गांभीर्य आहे हे दिसून आले. सोमवार दि. 10 रोजी हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली. मात्र, पहिल्या दिवशीच ‘आजचे कामकाज उद्यावर ढकला’ अशी मागणी सदस्यांनी लावून धरली होती. यावरून त्यांना उत्तर कर्नाटकाचा विकास, येथील पाणी समस्या, शेतकऱयांचा प्रश्न, दुष्काळी परिस्थिती याबाबत किती गांभीर्य आहे हे दिसून आले. पहिल्या दिवशी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अन्य दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहून शोक प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

मंगळवारी दुसऱया दिवशी विरोधी पक्षाचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी कृष्णानदीच्या पाण्यासाठी महाराष्ट्राशी कायमस्वरुपी समन्वय करार करा, अशी मागणी केली होती. या व्यतिरिक्त या भागातील गंभीर विषयांवर चर्चा करण्यात आली नाही. विरोधी पक्षनेते कोट्टा श्रीनिवास पुजारी यांनी सरकारने शेतकऱयांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. या बरोबरच हैदाबाद-कर्नाटक भागाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप सदस्यांनी केला होता. या भागातील दुष्काळी परिस्थितीवर सभागृहात चर्चा करण्याऐवजी भाजप सदस्यांनी टिपू जयंतीचा मुद्दा उपस्थित केल्याने सभागृहाचे कामकाज सुमारे तीन तास वाया गेले होते.

उत्तर कर्नाटकात पावसाअभावी कोटय़वधीची पीकहानी झाली असताना सभागृहात अन्य विषयांवरच चर्चा होत आहे. यामुळे बेळगावातील हिवाळी अधिवेशनाचा मूळ उद्देश हरवला आहे. या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरविण्यात येत असल्याने बेळगावसह उत्तर कर्नाटकातील समस्या सुटण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा या भागातील नागरिक, शेतकरी बांधवांतून व्यक्त होत होती. मात्र, दरवर्षीप्रमाणेच यंदाही केवळ नाईलाजास्तव या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरविण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

सोमवार दि. 17 पासून या अधिवेशनाच्या उत्तरार्धास सुरुवात होणार आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत सभागृहाचे कामकाज चालणार आहे. यामुळे पुढील चार दिवसात उत्तर कर्नाटकाच्या विविध प्रश्नांवर सभागृहात चर्चा होईल का? या भागातील शेतकऱयांच्या मागण्यांची पूर्तता, बेळगाव जिल्हय़ाशी संबंधित विविध समस्यांचे निवारण, या जिल्हय़ातील दुष्काळी तालुक्यांना पुरेसा पाणीपुरवठा, आदी गंभीर विषयांवर सभागृहात गंभीरपणे चर्चा होऊन सरकार प्रामाणिकपणे सर्व प्रश्न सोडवेल का? हे पाहावे लागणार आहे.