|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हजारो बांधकाम कामगार होणार सहभागी

हजारो बांधकाम कामगार होणार सहभागी 

मनरेगा कामगारांचीही धडक

प्रतिनिधी/ बेळगाव

कर्नाटक सरकारने बांधकाम कामगार आणि मनरेगा कामगारांच्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. या समस्यांच्या सोडवणुकीसाठी सरकारचे लक्ष वेधून घेण्याची गरज आहे. बांधकाम कामगार संघटना यासाठी मंगळवार दि. 18 रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करीत आहे. या मोर्चाला आंबेडकर कामगार संघ, इतर कामगार संघटना, भ्रष्टाचार निर्मूलन परिवार आणि राकुस या संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.

  बेळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष एन. आर. लातूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भ्रष्टाचार निर्मूलन परिवारचे अध्यक्ष सुजित मुळगुंद तसेच राकुसचे शिवाजीराव कागणीकर आणि विश्वेश्वरय्या हिरेमठ आदी उपस्थित होते. बांधकाम आणि मनरेगा कामगार एकत्रित धडक देत असून आमच्या समस्या सोडवा हीच प्रमुख मागणी असेल, अशी माहिती त्यांनी दिली.

  बांधकाम कामगारांच्या प्रमुख तीस मागण्या मांडल्या जाणार आहेत. यामध्ये अपघातात निधन झालेल्यांच्या वारसांना तात्काळ मदत, शिक्षण आणि विवाहासाठी मदत देण्याची तात्काळ व्यवस्था आणि मजगाव येथील कामगार खात्याचे कार्यालय हलवून बेळगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन करण्यात यावे, या मागण्या आहेत. अपघातात दगावलेले कामगार सुरेश सदावर यांची पत्नी, बाबू कोळीकोप यांचे वडील, संजय बाळाराम पाटील तसेच इतर आणखी दोन दिवंगत कामगारांना संघटनेने प्रयत्न करून मदत मिळवून दिली असून त्यांना धनादेश सुपूर्द केले जाणार आहेत.

  मनरेगा कामगारांची संख्या जिह्यात 28000 इतकी आहे. त्यापैकी फक्त 7200 जणांना स्मार्ट कार्ड देण्यात आले असून बाकीचे कार्डापासून वंचित आहेत. ज्यांना कार्डे मिळाली ती अद्याप कार्यान्वित झालेली नाहीत. कार्डे कार्यान्वित करण्याची यंत्रणा जिल्हा आणि तालुका पातळीवर अजून उपलब्ध करण्यात आलेली नाही, या समस्याही मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.

  मंगळवारी सकाळी 10.30 वाजता सर्व कामगार अलारवाड क्रॉस येथे जमणार असून तेथून मोर्चाने सुवर्णसौधकडे जाणार आहेत. तेथील आंदोलन स्थळावर दिवसभर आंदोलन केले जाणार आहे. सर्व कामगारांनी उपस्थित राहून आपल्या मागण्या मांडण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.