|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ऊस बिले द्या अन्यथा ‘लव्ह’लेटर पाठवू

ऊस बिले द्या अन्यथा ‘लव्ह’लेटर पाठवू 

जिल्हाधिकाऱयांची साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकांना समज

प्रतिनिधी/ बेळगाव

शेतकरी मोठय़ा कष्टाने ऊस पिकवितात. त्याचा त्यांना मोबदला मिळाला पाहिजे. पण शेतकऱयांना साखर कारखानदार योग्य दर आणि तोही वेळेत देत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. यावषी गळीत हंगाम सुरू होऊनही जिह्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांनी ऊस बिल दिले नाही. तेव्हा सोमवारपासून ऊस बिले तातडीने द्या. अन्यथा तुम्हाला ‘लव्ह’लेटर पाठवू, असा मार्मिक इशारा जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकांना दिला आहे.

ऊस बिलांसाठी साखर व्यवस्थापकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी या व्यवस्थापकांची चांगलीच झाडाझडती घेतली. जिह्यातील केवळ चारच साखर कारखान्यांनी यावषीची बिले देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये घटप्रभा, रेणुका शुगर्स, हर्षा आणि मलप्रभा साखर कारखान्यांचा समावेश आहे. मात्र, इतर साखर कारखान्यांनी अद्याप बिले देण्यास सुरुवात केली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकांना सोमवारपासून ऊस बिले द्या. अन्यथा कठोर कारवाई करू, असा इशारा दिला आहे.

सोमवारी सायंकाळपर्यंत सर्व अहवाल साखर कारखान्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा. जो साखर कारखाना अहवाल पाठविणार नाही त्यांना दुसऱयाच दिवशी नोटीस पाठविली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱयांनी दिला. शेतकऱयांच्या समस्या समजून घेत नसाल तर त्याचा काय उपयोग? शेतकरी जगला तरच तुम्ही-आम्ही जगू हे ध्यानात घ्या, असेही जिल्हाधिकारी बोम्मनहळ्ळी यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱयांना ऊस बिले देण्याबाबत तसेच एफआरपीप्रमाणे दर देण्याबाबत भरोसा दिला होता. तो भरोसा आता तुम्ही पाळणे गरजेचे आहे. शेतकऱयांना ऊस तोडणी केलेले पैसेही दिले पाहिजेत. काही साखर कारखाने केवळ आता ऊस तोडणी बिल एवढेच देत आहेत. मात्र, अद्याप जाहीर केलेला दर देण्यास तयार नाहीत. 2000 ते 2100 रुपयांपर्यंत केवळ चारच साखर कारखान्यांनी रक्कम दिली आहे. मात्र, ती किती शेतकऱयांना रक्कम दिली आहे, हे समजणे अवघड झाले आहे. तेव्हा त्याचाही अहवाल द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.

वजनकाटय़ाच्या तक्रारीबाबत गांभीर्य

काही साखर कारखान्यांच्या वजन काटय़ाबाबत तक्रारी वाढल्या आहेत. आम्ही त्यासाठी दोन पथके नेमून वजनकाटय़ांची तपासणी करत आहे. त्यामध्ये दोष आढळला नाही. परंतु शेतकऱयांमध्ये अशी चर्चा सुरू आहे. तेव्हा त्याबाबत प्रत्येकाने दक्षता घेऊन कायद्यानुसारच वजन काटय़ावर योग्य वजन झाले पाहिजे. अन्यथा, त्याबाबतही कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

वजन काटय़ाबरोबरच साखरेच्या उताऱयाच्या तपासणीबाबतही दक्षता घेतली जाणार आहे. आता लवकरच विविध साखर कारखान्यांना आठ दिवसांतून एकदा भेट देऊन साखरेचा उतारा तपासला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱयांची जुनी बाकी तातडीने द्या

काही साखर कारखान्यांनी शेतकऱयांची जुनी बाकी देणे अजूनही शिल्लक आहे. ती बाकी तातडीने द्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. मलप्रभा साखर कारखान्याने मागील बाकी दिली नाही, त्या साखर कारखान्याची साखर जप्त करण्यात आली आहे. ती साखर तातडीने विक्री करून शेतकऱयांना जुनी बाकी द्यावी, असा आदेश दिला आहे. मलप्रभा साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांनी साखर विक्रीचा अधिकार कारखान्याला द्यावा, त्यामुळे आम्हाला अधिक रक्कम मिळेल. त्यानंतर ती रक्कम शेतकऱयांना द्यायला सोपे जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर साखर आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱयांनी दिले.

ऊस तोडणीनंतर तातडीने ऊस न्या

ऊस तोडणी झाल्यानंतर शेतकऱयांचा ऊस तातडीने साखर कारखान्यांनी न्यावा. त्याच बरोबर वजनही लवकर करावे. कारण ऊस वाळला तर त्याचे वजन घटत आहे, अशा तक्रारी शेतकरी करत आहेत. तेव्हा ऊस तोडल्यानंतर तो जास्त वेळ न ठेवता त्याची तातडीने उचल करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे.

बैठकीला साखर कारखान्यांचे व्यवस्थापक गैरहजर

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या साखर कारखान्याचे व्यवस्थापकच या बैठकीला गैरहजर होते. याच बरोबर विश्वनाथ शुगर्स, शिरगुप्पी आणि बॅरी या साखर कारखान्यांचे व्यवस्थापक बैठकीकडे फिरकले नाहीत. त्यामुळे पुन्हा हे साखर कारखाने शेतकऱयांना सहकार्य करणार की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.