|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » विक्रमसिंघे श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी

विक्रमसिंघे श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी 

51 दिवसांनी पुन्हा घेतली पंतप्रधानपदाची शपथ

वृत्तसंस्था/ कोलंबो

 श्रीलंकेत युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते रानिल विक्रमसिंघे यांनी रविवारी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. 26 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी विक्रमसिंघे यांना पदावरून हटवत महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधानपदी नियुक्त केले होते. विक्रमसिंघे पंतप्रधान होताच श्रीलंकेतील 51 दिवसांपासून सुरू असलेले राजकीय संकट संपुष्टात आले आहे. या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. विक्रमसिंघे हे भारत समर्थक तसेच चीनचे विरोधक मानले
जातात.

श्रीलंकेचे वादग्रस्त पंतप्रधान राजपक्षे यांनी शनिवारी राजीनामा दिला होता. पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याच्या 51 दिवसांनी त्यांना हे पद सोडावे लागले आहे. श्रीलंकेच्या कोणत्याही पंतप्रधानाचा हा सर्वात कमी कार्यकाळ ठरला आहे. विक्रमसिंघे यांच्या समर्थकांनी राष्ट्रपतींच्या निर्णयाच्या विरोधात देशभरात निदर्शने केली होती. संसदेत राजपक्षे यांच्या विरोधात दोनवेळा अविश्वास प्रस्ताव संमत झाला, परंतु राष्ट्रपतींनी संसद विसर्जित करत त्यांना अभय दिले होते. सिरिसेना यांचा हा निर्णय तेथील सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाहय़ ठरविला होता.

श्रीलंकेतील राजकीय पार्श्वभूमी

राजपक्षे 2005 ते 2015 या कालावधीत श्रीलंकेचे राष्ट्रपती होते. विशेष बाब म्हणजे राजपक्षे यांच्या सरकारमध्ये सिरिसेना मंत्री म्हणून कार्यरत होते. राजपक्षे यांच्या विरोधात सिरिसेना यांनी 2015 मध्ये विक्रमसिंघे यांच्यासोबत आघाडी केली होती. दोघांच्या आघाडीने राजपक्षे यांना पराभूत करत सरकार स्थापन केले होते. पण कालौघात सिरिसेना आणि विक्रमसिंघे यांच्यातील संबंध दुरावले.

देशाचे नेतृत्व

श्रीलंकेत 1947 मध्ये पंतप्रधानपद निर्माण करण्यात आले. या 70 वर्षांमध्ये केवळ दोन पंतप्रधान डुडले सेनानायके आणि सिरिमावो भंडारनायके यांनीच 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. सिरिमावो चारवेळा पंतप्रधान झाल्या आणि एकूण 17 वर्षे त्यांनी हे पद सांभाळले. तर महिंदा राजपक्षे दोनदा पंतप्रधान झाले असून 6 एप्रिल 2004 पासून 19 नोव्हेंबर 2005 पर्यंत ते या पदावर होते. विक्रमसिंघे 1193, 2001 आणि 2015 मध्ये या पदावर आरुढ झाले होते.

श्रीलंकेच्या विकासासाठी कटिबद्ध

श्रीलंका हा भारताचा शेजारी तसेच मित्रदेश असल्याने आम्ही तेथील राजकीय अस्थिरता संपण्याचे स्वागत करतो. श्रीलंकेतील राजकीय पक्षांनी संकट संपुष्टात आणण्यासाठी प्रगल्भतेचे दर्शन घडविले. भारत श्रीलंकेच्या विकास प्रकल्पांसाठी कटिबद्ध आहे. दोन्ही देशांचे संबंध आगामी काळात आणखीन दृढ होतील असा आम्हाला विश्वास असल्याचे उद्गार विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी काढले आहेत.