|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत 20 रोजी संयुक्त बैठक

गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत 20 रोजी संयुक्त बैठक 

पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती : संयुक्त बैठकीत काढणार यशस्वी तोडगा

वार्ताहर / दोडामार्ग:

महात्मा ज्योतीबा फुले योजना कायमस्वरुपी सुरू करण्यासाठी येत्या 20 डिसेंबर रोजी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेऊन करार करण्यात येईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आरोग्याचा जनआक्रोश आंदोलनाला रविवारी भेट देऊन आश्वासन दिले. मात्र, त्या योजनेचा करार होत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी ठाम सांगितले.

दोडामार्गात सुरू असलेल्या आरोग्याचे जनआक्रोश आंदोलनाला आज रविवारी सातव्या दिवशी पालकमंत्री केसरकर यांनी भेट दिली. यावेळी आंदोलकांशी चर्चा करताना पालकमंत्री केसरकर म्हणाले, गोवा राज्यात सुरू केलेली आरोग्याची महात्मा ज्योतीबा फुले ही योजना अजूनपर्यंत तोंडी स्वरुपात सुरू आहे. गोव्यात परप्रांतीयांना मोफत आरोग्य सेवा अद्यापपर्यंत दिली जात आहे. मात्र सुरू असलेली महात्मा फुले योजना ही कायमस्वरुपी बांबोळी हॉस्पिटल व आजिलो हॉस्पिटलमध्ये दोन्ही ठिकाणी या योजनेचा लाभ मिळण्यासंदर्भात गोव्याचे आरोग्यमंत्री राणे यांच्याशी येत्या 20 डिसेंबर रोजी संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीतील आंदोलकांतील चार प्रतिनिधींनाही सोबत घेण्यात येणार आहे. या बैठकीत महात्मा फुले योजनेचा कायमस्वरुपी लाभ मिळण्यासंदर्भात व रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळण्यासंदर्भात करार करण्यात येणार असल्याचे केसरकर म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, गणेशप्रसाद गवस, गोपाळ गवस, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चाकोरकर, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, धनश्री गवस, संपदा देसाई, प्रवीण गवस, दोडामार्ग तहसीलदार ओंकार चितारी आदी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री केसरकर यांनी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल हे सावंतवाडीतच होणार असल्याचे सांगितले.

दोडामार्ग रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता!

केसरकर पुढे म्हणाले, दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय हे दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला आहे. येत्या काही कालावधीत या रुग्णालयाची सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा देण्यात येणार असल्याचे केसरकर म्हणाले.