|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आष्टय़ाच्या महिला पोलीस अधिकाऱयाची दबंगगिरी

आष्टय़ाच्या महिला पोलीस अधिकाऱयाची दबंगगिरी 

वार्ताहर/ आष्टा

वडिलांच्यावर असणाऱया तक्रारीच्या आधारे पत्नी व मुलाला मुंबईमध्ये जावून मारहाण करण्याचा भीम पराक्रम आष्टा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांनी केला आहे. या कारनाम्यात मुंबई येथील दोन पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱयांचाही सहभाग असून या विरोधात संबंधित कुटुंबाने मानवी हक्क आयोग, महिला आयोगासह उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. उच्च न्यायालयाने अनुराधा पाटील यांच्यासह यामध्ये सहभागी असणाऱयांना नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे आष्टा पोलिसांच्या कारभाराचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

याबाबत राजेश्वर विश्वासराव चव्हाण, राहणार साखराळे यांनी दिलेली अधिक माहिती अशी, साखराळे येथील विश्वास अण्णा चव्हाण यांच्याविरोधात 23 ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता. सदरच्या तक्रारीत विश्वासराव पाटील यांच्या व्यतिरिक्त कोणाचेही नाव नव्हते. तरीही चौकशीचा आधार घेत राजेश्वर चव्हाण आणि सौ. सुनंदा चव्हाण यांना अनुराधा पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी त्रास देण्यास सुरुवात केली. राजेश्वर चव्हाण व सौ. सुनंदा चव्हाण या मुंबईला मुलीकडे गेल्या होत्या. 10 नोव्हेंबर रोजी अनुराधा पाटील, आष्टा पोलीस ठाण्याचे गवळी यांनी बोरविली पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱयांच्या मदतीने उचलून नेवून आत्महत्येस प्रवृत्त केले.

चौकशीचा फार्स करीत अनुराधा पाटील व रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंभार व इतर सात ते आठ पोलीस कर्मचाऱयांनी 11 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता विश्वास चव्हाण यांची मुलगी किरण व जावई अविनाश नाईक तसेच सौ. सुनंदा चव्हाण यांना घरात घुसून मारहाण केली. तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली. दरम्यान, राजेश्वर चव्हाण याला मुंबई येथील महाराणा इन चेंबूर याठिकाणी रात्रभर डांबून ठेवून जबर मारहाण केली. यावेळी लेखणिक गवळी याने हॉटेलच्या गच्चीवरुन खाली उडी मार म्हणून राजेश्वर चव्हाण याचेवर जबरदस्ती केली. यास राजेश्वर याने विरोध करताच त्यास रबाळे पोलीस ठाण्यात आणून रात्रभर मारहाण केली. या घटनेने चव्हाण कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

या मारहाणीबाबत पोलीस निरीक्षक अनुराधा पाटील यांच्या विरोधात सुनंदा चव्हाण आणि राजेश्वर चव्हाण यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. उच्च न्यायालयाने अनुराधा पाटील व त्यांना सहकार्य करणाऱया सर्वांना नोटिसा जारी केल्या आहेत. तसेच सदर घटनेबाबत मानवी हक्क आयोगाकडेही तक्रारी देण्यात आल्या आहेत. याचबरोबर चव्हाण कुटुंबियांनी महिला आयोगाचाही दरवाजा ठोठावला आहे. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल, असा पराक्रम अनुराधा पाटील यांनी केला आहे. या घटनेने आष्टा पोलिसांची पुरती नामुष्की झाली असून अशा पोलिस अधिकाऱयांवर कडक कारवाई होण्याची मागणी जोर धरत आहे.