|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » टुकार तक्रारींसाठी मुख्याधिकाऱयांच्या चौकशीसाठी समिती पालिकेत

टुकार तक्रारींसाठी मुख्याधिकाऱयांच्या चौकशीसाठी समिती पालिकेत 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा नगरपालिकेत मंगळवारी दुपारी प्रांत कार्यालयातील पाच सदस्य मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यावरील 14 तक्रारींची चौकशी करण्यासाठी दाखल झाले. परंतु, या 14 तक्रारींवर नजर टाकली असता एवढय़ा टुकार तक्रारींसाठी
प्रांत कार्यालयातील समिती आली याचेच अनेकांनी वाभाडे काढले. तर मुख्याधिकारी शंकर गोरे यांना प्रांत कार्यालयातर्फे व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे याबाबत कोणतीही पूर्वसूचना वा पत्र देण्यात आले नसल्याचे समोर येत आहे.

सध्या आंधळं दळतंय व कुत्रं पीठ खातंय, अशीच काहीशी अवस्था नगरपालिका व प्रांत कार्यालयाची झाली आहे. नगरपालिकेसमोर महत्वाचे अनेक
प्रश्न असताना त्याला बगल देवून काही नागरिकांनी मुख्याधिकारी गोरे यांच्यावर राग काढण्यासाठी तर काहींनी स्वार्थासाठी जिल्हाधिकाऱयांकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारी चौकशी करण्याएवढय़ा मोठय़ा नसल्याचे या तक्रारींकडे पाहिल्यानंतर लक्षात येते.

सुनील भोजने या नगरपालिकेतील कर्मचाऱयाने स्वतःहून सेवानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर पुढील महिन्यात ते नगरपालिकेत पुन्हा कामावर घ्यावे म्हणून मुख्याधिकाऱयांना भेटू लागले. एकदा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर पुन्हा कामावर घेता येत नाही हा नियम माहिती असताना सुध्दा भोजने यांनी मुख्याधिकारी गोरेंवर निशाणा साधत चुकीची सेवानिवृत्ती दिल्याबाबत तक्रार केली आहे. तर विद्याधर आपटे (रा. चिमणपुरा) यांनी चिमणपुरा येथे अनधिकृत बांधकाम केल्याबाबत
तक्रार केली आहे. तसेच चंद्रकांत कोठावळे यांनी लोकशाही दिनात अशोक मोने यांना अपात्र घोषित करुन गो. रा. मोहिते यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी तर तन्वीर बागवान (रा. बुधवार पेठ) यानेही बुधवार पेठेतील अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार केलेली आहे. अशा विविध तक्रारी ज्यासाठी खास चौकशी समितीमार्फत चौकशी करण्याची आवश्यकता नव्हती, तरीही प्रांत कार्यालयातील पाच सदस्यीय चौकशी समिती पालिकेत दाखल झाली. त्यानंतर मुख्याधिकारी गोरे यांनी कोणतेही आढेवेढे न घेता आपल्या कर्मचाऱयांना त्यांना जी काही माहिती हवी आहे ती देवून सहकार्य करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार तब्बल तीन तास ही समिती पालिकेतील कागदपत्रे तपासात होती.

असे आहे या तक्रारींचे स्वरुप

सातारा शहरात कचरा गोळा करणाऱया साशा हाऊस किपिंग ऍण्ड फॅसिलिटी मॅनेजमेंट या कंपनीसह दोषी अधिकाऱयांवर कारवाई करावी. पालिकेत झालेल्या कामांच्या पुन्हा निविदा काढून जनतेच्या पैशाचा अपव्यय झाल्याची तक्रार, सदरबझार येथील मिळकतीचे बेकायदा हस्तांतरण, अवैधरित्या जमिनीचे वाटप व शासनाचा महसूल बुडवल्याबाबत मुख्याधिकाऱयांवर कारवाईची मागणी, माची पेठेतील अस्वच्छतेबाबत तक्रार, कोटेश्वर पूल निविदा प्रक्रियेतील दोषी अधिकाऱयांवर कारवाईची मागणी तर संजय साळुंखे या महाशयाने मुख्याधिकाऱयांनी आर्थिक फसवणूक केली व आता जबाबदारी टाळत असल्याची तक्रार केली आहे तर नरेंद्र पाटील यांनी वृक्षविभागातील आर्थिक घोटाळय़ाबाबत तक्रार केली आहे.

Related posts: