|Sunday, August 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » प्रेम अन्योन्य असते

प्रेम अन्योन्य असते 

भगवान श्रीकृष्ण उद्धवांना पुढे सांगतात-उद्धवा! यशोदामाईसारखे प्रेम मला इथे दुर्लभ आहे. जोपर्यंत मी खात नसे तोपर्यंत ती उपाशीच राहात असे. इथे मथुरेत भोजनसामग्रीचा तर ढीग आहे, परंतु प्रेमाने खाऊ घालणारा नाही. इथे तर माझी भूकच मरून गेली आहे. जेव्हा कोणी हजार वेळा मनधरणी करील तेव्हा मी खात असे. इथे तर अशी मनधरणी करणारे कोणीच नाही. जेवायला बसलो की यशोदामय्याची आठवण येते. मी भोगाचा नाही, प्रेमाचा भुकेला आहे. जो आनंद गोकुळात होता तो येथे नाही. तिथे सखे, सख्या, गाई सर्वच माझी आठवण काढून रडत असतील. मी व्रज विसरू शकत नाही.

उद्धव म्हणतात-लहानपणी गोपाळांबरोबर खेळत राहणे ठीक आहे, पण आता तर आपण मथुरेचे राजे आहात. आणि एका राजाने गोपाळांबरोबर खेळण्याचा विचार करणे योग्य नाही. तुम्ही जर व्रज आणि सर्व व्रजवासियांना विसरून जाल तर मथुरेचे ऐश्वर्य आनंददायी होईल. ज्ञानाभिमानी उद्धव जाणत नाहीत की ते कोणाला उपदेश देत आहेत. श्रीकृष्ण म्हणतात-उद्धवा, तू मला व्रज विसरून जायला सांगत आहेस! मी सर्व काही विसरू शकेन पण व्रज विसरू शकत नाही. व्रजवासीसुद्धा माझी खूप आठवण करीत असतील. प्रेम अन्योन्य असते. हो! व्रज विसरण्याचा एक उपाय आहे. जर ते मला विसरतील तर मी पण त्यांना विसरू शकेन. उद्धवा! तू व्रजाला जा. तिथे त्यांना वेदान्ताचा उपदेश दे आणि त्यांना सांग की त्यांनी मला विसरून जावे. जर ते मला विसरू शकले नाहीत तर मीही त्यांना विसरू शकणार नाही. संसारातील सगळय़ा सुखांचा त्याग करून ते सर्वच्या सर्व माझ्याच करता जगत आहेत. मी परत गोकुळात येण्याचे वचन दिले होते म्हणून ते माझ्या प्रतीक्षेत प्राण टिकवून आहेत. तू त्यांना उपदेश देऊन निराकार ब्रह्माचे उपासक कर. तसे झाले म्हणजे ते मला विसरतील आणि मीही त्यांना.

मोह एकपक्षी असतो तर प्रेम पारस्पारिक असते, अन्योन्य असते. भक्तिहीन ज्ञानी वाचाळ असतो. भक्तीयुक्त ज्ञानी मौन राखून अध्ययन करतो. उद्धवांजवळ ज्ञान होते, परंतु भक्ती नव्हती. ते म्हणू लागले-मला तिथे पाठविण्याऐवजी दर आठवडय़ाला एक पत्र लिहा. तेही आपल्याला पत्र पाठवीत राहतील. याप्रमाणे पत्रव्यवहाराने प्रत्यक्ष भेटीचा आनंद होईल.

प्रेमाचा संदेश पूर्णपणे पत्राने कसा पाठविला जाऊ शकतो? प्रेम तर प्रत्यक्ष भेट झाल्यावरच पूर्णपणे व्यक्त केले जाऊ शकते! पत्रात इच्छेप्रमाणे सर्वच कसे काय लिहिता येऊ शकते? पत्र लिहिताना पुष्कळ मर्यादा येत असतात. प्रेमतत्वाशी उद्धवाचा परिचय नव्हता. पत्रांत लिहितात-अखंड तुझीच आठवण करीत असलेली. असे कधी होऊ शकते काय? विचार आणि व्यवहारात अंतर असते म्हणूनच पत्रांत सर्व काही मोकळेपणाने आणि खरे खरे लिहिले जात नाही, लिहिले जाऊ शकत नाही.