|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » चंचल लक्ष्मी चंचल हे जाणावे

चंचल लक्ष्मी चंचल हे जाणावे 

सुभाषित- आपद्गतं हससि किं द्रविणान्ध मूढ

लक्ष्मीः स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम् ।

एतान् प्रपश्यसि घटान् जलयंत्र चपे

रिक्ताः भवन्ति भरिता भरिताइच रिक्तः।।

अन्वय- (हे) द्रविणान्ध मूढ, आपद्गतं (नरं) किं हससि? लक्ष्मीः स्थिरा न भवति इति अत्र किं चित्रम्? त्वम् एतान् चलयत्रचपे घटान् पश्यसि (नु)? रिक्ताः (कूपं गताः ते) भरिताः भवन्ति (उपरि गत्वा जलं विसृज्य) भरिताः (पुनः) रिक्ताः भवन्ति ।

अनुवाद- संपत्ती (च्या धुंदी)ने आंधळा बनलेल्या मूर्खा, तू अडचणीत सापडलेल्या माणसाला (उपहासाने) का बरे हसतोस? हे रहाटावरचे गाडगे पाहतोस ना? ते रिकामे विहिरीत गेल्यावर भरतात. आणि भरलेले (वर येऊन पाणी ओतल्यावर) रिकामे होतात.  विवेचन- अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला सहानुभूती दाखविणे वा मदत करणे, हे सोडून उपहासाने हसणाऱया पैशांच्या मस्तीने जणू आंधळा बनलेल्या मूर्ख धनदांडग्याची कानउघाडणी करणारे हे सुभाषित आहे. अशा माणसाला आपले वैभव चिरस्थायी वाटते आणि अकिंचन माणसाबद्दल काहीही सहानुभूती वाटत नाही. स्वतःबद्दलचा फाजील आत्मविश्वास आणि इतरांबद्दलची असंवेदनशीलता यासाठी कारणीभूत नसतात. पैसे येतात, जातात. लक्ष्मी ही चंचल असते, हे त्यांच्या गावीही नसते. लक्ष्मीच्या चंचलपणाबद्दल एक मार्मिक सुभाषित आहे.  या स्वसद्मनि पद्मेपि संध्यावधि विजृंभते । इन्दिरा मंदिरे ।़ न्येषां कथं स्थास्यति निश्चला ।। कमळ हे लक्ष्मीचे निवासस्थान. तेथेही ती जेमतेम संध्याकाळपर्यंत राहते. मग (कमळ मिटण्यापूर्वी) हळूच तेथून निसटते. तेव्हा (जिचा पाय स्वतःच्या घरातच दिवसभरही टिकत नाही) ती दुसऱयांच्या घरी (बस्तान ठोकून) कशी बरं स्थिर राहील? या संदर्भात गोमंतकातील एका पिढीजात धनवान घराण्याची दंतकथा ऐकिवात आहे. लक्ष्मी आली असता त्या घरातल्या सुनेने म्हणे तिला सांगितले ‘थांब, लक्ष्मी कुंकू लावते’. सुवासिनी लक्ष्मी कुंकवाला कशी नाही म्हणणार! ती आपली वाट पहात थांबली. इकडे ती सून परसदारी अंगणात गेली आणि तिने विहीर जवळ केली. लक्ष्मी आपली अजून तिच्या कुंकवाची वाट पहात त्या घरी स्थिर आहे! काही वर्षापूर्वी त्या घराण्याने खाणीमध्ये गुंतवलेला पैसा खाणी विकून अन्यत्र गुंतवला. त्यामुळे आज गोव्यात खाणी बंद असूनही त्यांच्या लक्ष्मीला धक्का लागलेला नाही! त्यांच्या सुनेने चतुराईने बलिदान करून चंचल लक्ष्मीला आपल्या घरी स्थिर केले पण ते काही सर्वांना जमणार नाही. तेव्हा लक्ष्मी चंचल हे लक्षात ठेवून वागावे. अडचणीतल्यांचा उपहास करू नये, जमल्यास मदतच करावी.