|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कुंभच्या आयोजनासाठी प्रयागराज सज्ज

कुंभच्या आयोजनासाठी प्रयागराज सज्ज 

प्रयागराज / वृत्तसंस्था :

कुंभचे आयोजन करण्यासाठी प्रयागराज नगरी सज्ज झाली आहे. संगमाचे पूर्ण क्षेत्र रात्रीच्या वेळी अद्भूत रोषणाईत उजळून निघत आहे. प्रयागराज यापूर्वी कधीच इतक्या सुंदरपणे नटविण्यात आले नव्हते असे उद्गार स्थानिक नागरिक काढत आहेत. संगमाच्या घाटावर रंगबिरंगी रोषणाई भाविकांना आवडत असून यावरून प्रयागराजचे रहिवासी योगी सरकारवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

कुंभ मेळे पाहिले परंतु अशी व्यवस्था कधीच अनुभवली नसल्याचे प्रयागराजच्या एका वृद्ध महिलेने सांगितले. कुंभमेळय़ासाठी योगी सरकारकडून नियुक्त विशेष अधिकारी विजय किरण आनंद स्वतः अहोरात्र संगमावर तयारींचा आढावा घेत आहेत. यंदाच्या कुंभ महापर्वावेळी भाविक आणि पर्यटकांना नवे रुप पाहायला मिळणार आहे.

यंदाचा कुंभ एक नवा अनुभव प्रदान करेल. भाविकांना संस्मरणी अनुभव मिळेल यादृष्टीने दिव्य कुंभची परिकल्पना राबविण्यात आली आहे. संगमावर 10 किलोमीटर लांबीचे घाट आणि चेजिंग रुम निर्माण करण्यात आले आहेत. स्वच्छ कुंभच्या योजनेंतर्गत 1 लाख 22 हजार 500 शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी 20 हजार कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आल्याचे आनंद यांनी सांगितले.

प्रशासनानुसार यंदाच्या कुंभमध्ये 12 कोटी भाविक भेट देतील असा अंदाज आहे. मेळय़ाचे अधिकारी या आकडेवारीवर नजर ठेवून तयारीच्या कामात व्यस्त आहेत. प्रयागराजचे सौंदर्य वाढविण्यासाठी रेल्वेने देखील मोठी तयारी केली आहे. यमुना नदीवरील जुना लोखंडी पूल रोषणाईने सजविण्यात आला आहे. यमुना नदीवर याच्या प्रकाशाने तयार होणारे दृश्य विलोभनीय ठरत आहे. यंदाचा कुंभमेळा दिव्य ठरावा असा योगी सरकारचा प्रयत्न असला तरीही भाविकांचे आगमन सुरू झाल्यावर खरी आव्हाने समोर येणार आहेत.