|Saturday, February 23, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » ‘सेरेब्रल पाल्सी’ग्रस्त कणादकडून कळसूबाई सर

‘सेरेब्रल पाल्सी’ग्रस्त कणादकडून कळसूबाई सर 

 पिंपरी / प्रतिनिधी :

चिंचवड येथील कणाद प्रशांत पिंपळनेरकर या किशोरवयीन विशेष मुलाने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाईवर यशस्वी गिर्यारोहण केले. लहानपणापासून ‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराने ग्रस्त असूनही त्याने ही भरारी घेतली असून, विशेष मुले आणि त्यांच्या पालकांसाठी हे यश उत्साहवर्धक व प्रेरणादायक ठरणार आहे.

तज्ञ डॉक्टरांनी कणाद कधीही चालू शकणार नाही, असे सांगितले होते. त्याउलट कणादने आयप्पाच्या छोटय़ा टेकडीपासून सरावास सुरुवात केली. सातत्याने सराव व प्रयत्नांची पराकाकरत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाईवर यशस्वी गिर्यारोहण करून सतत प्रयत्नशील राहण्याचा चांगला संदेश दिला आहे. कणाद पुणे येथील बालकल्याण संस्थेत वेगवेगळय़ा गोष्टी शिकत आहेत. गेल्या वषी 7 दिवसांत 11 किल्ले सर केल्याच्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकोर्डने नोंद घेतली आहे. यावषी नारायणगड, हडसर, चावंड हे तीन किल्ले आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई ही सलग चढाईची मोहीम आई-वडिलांसोबत कणादने फत्ते केली.

23 डिसेंबर रोजी नारायणगड तीन तासांत आणि चार तासांत हडपसर या गिरिदुर्गांवर यशस्वी आरोहण केले. 24 ला किल्ले चावंड या गिरिदुर्गाची चढाई चार तासात पूर्ण केली, तर 25 ला सकाळी नऊ वाजता कळसूबाई शिखराची चढाई सुरू केली. शिखरावर जाणाऱया वाटेतल्या चार लोखंडी शिडय़ा हे कणादसाठी एक मोठेच आव्हान होते. मात्र, न डगमगता, भीतीवर मात करत दुपारी दोन वाजता कळसूबाईचा शिखरमाथा त्याने गाठला. वर पोचताच कणादने भगवा झेंडा आणि राष्ट्रध्वज फडकवून आपला आनंद व्यक्त केला. कळसूबाईचे दर्शन व आशीर्वाद घेऊन पायथ्याला सायंकाळी सात वाजता सुखरूप पोहोचून कणादने मोहीम पूर्ण केली.

या मोहिमेतील नारायणगड, हडसर आणि चावंड हे तिन्ही किल्ले गिर्यारोहणाच्या वाटासाठी वैविध्यपूर्ण आहेत. त्यामुळे या तिन्ही किल्ले चढाईचा एकत्रित अनुभव लगेचच कळसूबाई शिखर चढण्यास कामी आला. विशेष मुलाद्वारे कळसूबाई शिखर सर केल्याची ही पहिलीच वेळ असल्याची भावना शिखर पायथ्याच्या बारी ग्रामस्थांनी व्यक्त केली. आई दर्शना आणि वडील प्रशांत पिंपळनेरकर म्हणाले, निसर्गरम्य ठिकाणी, डोंगरी भागात वेगवेगळय़ा वाटांवर भटकंती करताना कणादच्या नैसर्गिक क्षमताही वाढू लागल्या आहेत. यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने दिलेल्या सहकार्य आणि प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाले आहे.

 

 

 

Related posts: