|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीत बिबटय़ाची अफवा

सांगलीत बिबटय़ाची अफवा 

गर्व्हमेंट कॉलनी परिसरातील नागरिक भयभयीत

प्रतिनिधी/ सांगली

सांगलीत शनिवारी बिबटया दिसल्याची जोरदार अफवा पसरल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गर्व्हमेंट कॉलनी परिसरात बिबटया दिसल्याचे काही लोकांनी सांगितल्यावर शहरात एकच खळबळ उडाली. वन विभागाचे व स्थानिक लोकांनी गर्व्हमेंट कॉलनीचा भाग पिंजून काढला. यात कॉलन्या, मंदिरे तसेच काही जुन्या घरांचे पाठीमागील भाग येथे लोक बिबटयाचा शोध घेत होते. पण रात्री उशिरापर्यंत येथे काहीही आढळून आले नाही. दरम्यान वन विभागाने पहाटे फिरायला जाणाऱयांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

गर्व्हमेंट कॉलनीच्या शेवटच्या बसस्टॉपजवळ शनिवारी सायंकाळच्या सुमारास एका व्यक्तीला हा बिबटया फिरताना आढळून आला. त्या व्यक्तीने तेथून पोबारा केला. या व्यक्तीने बिबटया दिसल्याचे अन्य लोकांना सांगितले. त्यामुळे येथे लोकांची प्रचंड गर्दी जमली. तोपर्यंत ही वार्ता वनविभागाच्या अधिकाऱयांना कळविली. काही क्षणातच वन विभागाचे काही कर्मचारी तेथे दाखल झाले. वन विभाग, माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांच्यासह स्थानिक लोकांनी तासभर गर्व्हमेंट कॉलनी, एस. टी. कॉलनी, एम. एस. ई. बी. कॉलनी, वालचंद कॉलेजच्या पिछाडीचा भाग, धामणी रोड, स्फुर्ती चौक आदी भाग पिंजून काढला.

गर्व्हमेंट कॉलनीच्या पाठीमागे आता मोठया प्रमाणात अपार्टमेंट उभी राहिली आहेत. धामणी रोडवरही अनेक अपार्टमेंट व नागरी वस्ती झाली आहे. तरीही या भागातून शेती असणाऱया भागातून बिबटया आला असावा, अशी शक्यता काहीजणांनी व्यक्त केली. नगरसेविका सविता मदने, सामाजिक कार्यकर्ते राजू मदने यांच्याकडे गर्व्हमेंट कॉलनीतील लोक फोनवरून विचारणा करत होते. त्यांनीही वन विभागाच्या लोकांना माहिती घेण्यास सांगितले. वन विभागाला येथे काहीही आढळून आले नाही. पण गर्व्हमेंट कॉलनी भागात यामुळे लोकांच्यात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले.

जिल्हा प्रशासन आणि पोलीस ठाणे यांच्याकडे लोक फोन करून बिबटयाची खात्री करत होते. रात्री उशिरापर्यंत येथे शोध मोहिम सुरू होती. पण येथे बिबटया आढळून आला नाही. पण वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून पहाटे फिरायला जाणाऱया लोकांना सतर्कचे आवाहन केले आहे.

लोकांची रात्रभर गस्त…….

दरम्यान गर्व्हमेंट कॉलनी परिसरात कोठेही बिबटया दिसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही स्थानिक लोक रात्रभर येथे गस्त घालणार आहोत. अशी माहिती येथील माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी दिली.