|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाण समस्येबाबत सुरेश प्रभू सरदेसाई यांच्यात चर्चा

खाण समस्येबाबत सुरेश प्रभू सरदेसाई यांच्यात चर्चा 

प्रतिनिधी/ पणजी

खाण व्यवसाय लवकर सुरू न झाल्यास खाणपट्टय़ात फिरणे कठीण होईल. त्यामुळे खाण समस्या सोडविण्यासाठी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी मदत करावी, अशी विनंती नगरनियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी सुरेश प्रभू यांना केली आहे. केंद्रीयमंत्री प्रभू काल शनिवारी गोव्यात आले होते. त्यावेळी सरदेसाई यांनी त्यांच्यासोबत खाण समस्येबाबत चर्चा केली.

प्रभू यांनी शनिवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचीही भेट घेतली. सरदेसाई यांच्यासोबत त्यांनी सिदाद दी गोवा हॉटेलमध्ये जेवणे केले. यावेळी सरदेसाई व त्यांच्यामध्ये खाणबंदीच्या समस्येबाबत चर्चा झाली. मंत्री प्रभू हा विषय पुढे नेतील व केंद्र सरकारकडून यावर तोडगा निघेल, असे सरदेसाई म्हणाले.

प्रभूंना विषयाची जाणीव

खाणबंदीचे आर्थिक परिणाम काय होऊ शकतील व राजकीय परिणाम काय होतील, याची जाणीव प्रभू यांना आहे. त्यामुळे गोव्यातील खाणींचा विषय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवतील, अशी अपेक्षाही सरदेसाई यांनी व्यक्त केली. गोव्यात खाण व्यवसाय सुरू झाला नाही तर राजकीय पक्षाना खाणपट्टय़ात फिरणे कठीण होईल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खाण व्यवसाय सुरू होणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

खाण व्यवसाय हा गोव्यातील खाण अवलंबितांच्या दैनंदिन जगण्याचा विषय आहे. हा विषय अद्याप सोडविणे सरकारला शक्य झालेले नाही, पण कोणत्याही परिस्थितीत ही समस्या सोडविणे गरजेचे असल्याचे सरदेसाई यांनी प्रभू यांना सांगितले. कृषी, मासळी, पर्यटन हे व्यवसाय जसे गोव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, तसाच खाण व्यवसायही गोव्यासाठी महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले.