|Monday, July 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सुविधा पुरवून रेल्वेत जाहिरात करणार कंपन्या

सुविधा पुरवून रेल्वेत जाहिरात करणार कंपन्या 

नवी दिल्ली

 जुन्या काळात प्रचलित ‘वस्तू विनिमय’ पद्धत रेल्वे नव्या प्रकारे स्वीकारणार आहे. यांतर्गत कंपन्यांना वस्तू आणि सेवांच्या बदल्यात रेल्वेगाडय़ांमध्ये जाहिरातीची संधी दिली जाणार आहे. याच कारणामुळे जर तुम्हाला रेल्वेत कोणत्याही साबण कंपनीची जाहिरात दिसून आली आणि तेथील स्वच्छतागृहात त्याच ब्रँडचा साबण दिसून आल्यास चकित होऊ नका. यासंबंधी रेल्वेच्या सर्व महाव्यवस्थापकांना 27 डिसेंबर रोजी निर्देश देण्यात आला आहे. आम्ही एका अनोख्या विचारावर प्रयोग करत आहोत. वस्तू-विनिमय पद्धतीत रकमेची देवाणघेवाण होत नाही. दरदिनी लाखो लोक रेल्वेंमधून प्रवास करतात. रेल्वेच्या माध्यमातून या ब्रँड्सना मोठी प्रसिद्धी मिळू शकते असा दावा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयाने केला.

अशी असणार पद्धत

एका कोचिंग डेपो ऑफिसरला (सीडीओ) अशाप्रकारचा प्रस्ताव मिळाल्यास तो रेल्वेच्या संकेतस्थळावर 21 दिवसांसाठी प्रदर्शित केला जाईल. यातून अशाप्रकारच्या उत्पादनांसाठी स्वारस्य बाळगणाऱया अन्य संबंधितांना देखील समान संधी मिळावी असा यामागचा हेतू आहे. प्रतीक्षा कालावधी संपुष्टात आल्यावर सीडीओ एका कंपनीची निवड करू शकतो. प्रारंभीच्या काळात अशाप्रकारच्या जाहिरातीसाठी सीडीओ प्रत्येक डेपोत दोन रेल्वेंसाठी तीन महिन्यांकरता अनुमती देऊ शकतो असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जाहिरातीचे स्वरुप

प्रारंभिक काळात सेवेऐवजी वस्तू स्वीकारण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत. कंपन्या रकमेच्या जागी स्वतःचे उत्पादन आम्हाला पुरवू शकतात. आम्ही त्यांना रेल्वेंमध्ये जाहिरातींची संधी देणार आहोत असे अधिकाऱयाने सांगितले. प्रत्येक डब्यातील स्वच्छतागृहात किंवा दरवाजानजीक कमाल 4 उत्पादनांचे फलक लावले जाऊ शकतात. नियमानुसार जाहिरातीचा आकार 6 इंच गुणिले 6 इंच असणार आहे.