|Thursday, August 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अहं व आंतरिक पोकळी

अहं व आंतरिक पोकळी 

मनुष्य आपल्या जीवनात सतत काही न काही मिळविण्यासाठी काही ना काही बनण्यासाठी धडपडत असतो. एक गोष्ट मिळाल्यावर त्याला दुसरी गोष्ट हवी असते व ती मिळाल्यावर तिसरी. त्याच्या मागण्या कधी संपतच नाहीत. त्याचे संपूर्ण जीवन काही न काही मिळविण्यात संपून जाते पण मृत्यूनंतरही त्याला स्वर्ग अथवा मुक्ती हवी असते! माणसाला गोष्टींचा इतका हव्यास का असतो? का तो त्यांच्या इतका मागे लागलेला असतो? असे तर नाही ना, की या धडपडीतूनच त्याला आपल्या जिवंतपणाची जाणीव होत असते, आपल्या जीवनाचे काहीतरी उद्दिष्ट असल्यासारखे असते. आपल्या जीवनातील संघर्ष व दुःख क्रमशः दूर होत आहे असे भासत असते? त्याला असे तर वाटत नाही ना, की त्याची ही धडपड थांबली तर स्वतःचे अस्तित्त्व म्हणता येईल असे काहीच त्याच्याजवळ उरणार नाही, तो स्वतःला हरवून बसेल आणि त्याचे जीवन निरर्थक होईल?

साधारणपणे माणसाच्या आत एकाकीपण, या जगात आपले कोणीच नसल्याची भावना, एक प्रकारचे अपूर्णत्त्व, एक मानसशास्त्राrय पोकळी-आपण कोणीही नसल्याची भावना दिसून येते. मनुष्य बाहेरून जितका अधिक डामडौल दाखवत असतो तितकाच तो आतून पोकळ असतो. या आंतरिक पोकळीचे कारण आहे माणसात दिसून येणारी सतत काही न काही बनण्याची, काही न काही मिळवण्याची अभिलाषा. परंतु मनुष्याने कितीही मिळविले, तो कितीही महान झाला तरी त्याची ही आंतरिक पोकळी कधीही भरून निघत नसते. माणसाने तिच्यापासून दूर पळून जाण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती सावलीप्रमाणे त्याच्या मागोमाग येत असते. त्याने तिच्याकडे कितीही दुर्लक्ष केले तरी ती तेथेच त्याच्या आत वसलेली असते. मनुष्यातील अहं (इगो) आपल्या स्वकेंद्रित क्रियाकलापांनी ही आंतरिक पोकळी निर्माण करत असतो व टिकवून ठेवत असतो. या अहंला सतत काही न काही बनायचे असते व म्हणूनच त्याला या पोकळीची म्हणजेच आपल्या काहीही नसण्याची भीती वाटत असते. यामुळे तो या पोकळीला झाकण्याचे, तिच्यापासून दूर पळून जाण्याचे, तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रयत्न करत असतो. अहंने निःस्वार्थी बनण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो स्वार्थीच राहतो. कारण मी स्वार्थी असता कामा नये असे म्हणण्यातदेखील स्वार्थच आहे. अहं ज्या गोष्टीशी सारुप्य पावतो, त्या गोष्टीत विकृती आणतो. एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या दोन व्यक्तींच्या मनात जेव्हा अहंकार निर्माण होतो, तेव्हा त्या प्रेमाचे रुपांतर द्वेषात झालेले असते. माणसात सत्तेचा अहंकार निर्माण होतो. तेव्हा भ्रष्टाचाराला सुरुवात झालेली असते. अहंचे अस्तित्वच भूतकाळावर आधारित असल्याने त्यात कोणतेही नाविन्य नसते. त्यामुळे अहं ज्या गोष्टीशी सारुप्य पावतो त्या गोष्टीतील नाविन्य संपवून टाकतो, नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन तो जुन्या वर्षाचाच विस्तार करत असतो. श्रीमंतीचा देखावा करून अथवा परित्यागाचा आव आणून अहं आपले हे आंतरिक दारिद्रय़ लपवू शकत नाही. आपल्या अंतर्गत व बाहय़ क्रियाकलापांनी अहं हा स्वतःला समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करत असतो व त्याला तो अनुभव अथवा स्वतःच्या सोयीनुसार अन्य समाधानकारक नाव देत असतो. अहं हा कधीही अनामिक नसतो. तो भलेही नवा पेहराव करेल, वेगळे नाव धारण करेल पण सारुप्य पावणे हा त्याचा स्वभावच असतो. ही सारुप्य पावण्याची प्रक्रियाच अहंला स्वतःच्या खऱया स्वरुपाची जाणीव होऊ देत नाही. सारुप्य पावण्याची ही संचयी प्रक्रियाच सकारात्मक अथवा नकारात्मक पद्धतीने अहंची रचना करत असते. अहंचे क्रियाकलाप हे कितीही विस्तृत असले तरी ते नेहमी त्याला बंदिस्त करणारे असतात. काहीतरी बनण्याचा अथवा न बनण्याचा अहंचा प्रत्येक प्रयास हा त्याला स्वतःच्या वास्तवापासून दूर नेत असतो. त्याचे नाव, त्याचे गुणदोष, त्याच्या ताब्यातील गोष्टी सोडल्या तर हा अहं म्हणजे असतो तरी काय? त्याचे सर्व गुणधर्म काढून टाकले तर हा अहं किंवा मी असतो तरी का? काहीही नसण्याची ही भीतीच अहंच्या क्रियाकलापांचा चालना देत असते. परंतु अहं असे काहीही नसते अहं म्हणजे एक पोकळीच असते.

आपण जर या आंतरिक पोकळीला सामोरे जाऊ शकलो, त्या दुखऱया एकाकीपणासमवेत राहू शकलो तर त्यासंबंधीची भीती पूर्णतया नाहीशी होऊन आपल्यात एक मूलभूत परिवर्तन घडून येऊ शकते. पोकळीला सामोरे जाणे म्हणजे आपण स्वार्थी आहोत या वस्तुस्थितीकडे केवळ पाहणे आणि निःस्वार्थी बनण्याची कोणतीही हालचाल न करणे. कारण आपल्या मनात खोलवर कधीही तपासून न पाहिलेला स्वार्थीपणा व स्वकेंद्रीतता असते. व यासोबत जगत आलेल्या मनाची कोणतीही हालचाल स्वार्थापणासंबंधी केलेली कोणतीही कृती स्वार्थीपणा आणखी मजबूत करते. त्याची रचनाच बदलून टाकते व ही नवी रचना म्हणजेच निःस्वार्थीपणा असा भ्रमही निर्माण करते. म्हणून सामोरे जाणे म्हणजे विचाराच्या किंवा कृतीच्या कोणत्याही हालचालीशिवाय पाहणे, ईश्वराच्या नावाने अथवा अन्य गोष्टींच्या नावाने केलेल्या स्वकेंद्रीत कृतींकडे पाहणे, भूतकाळाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पाहणे.

आपण आरशात आपला चेहरा पाहतो तेव्हा आपल्याला तो जसाचा तसाच पाहणे भाग असते. आपल्याला तो कितीही बदलावासा वाटला तरी तो आहे तसाच राहतो. अगदी तितक्याच निखळपणे कोणत्याही विरुपणाशिवाय कोणत्याही दडपणाशिवाय केवळ पाहणे. अशा प्रकारचे पाहणेच स्वार्थीपणाचे सर्व परिणाम उघड करते आणि तसे अवलोकन मनाचा स्वार्थीपणा धुवून टाकते. जेव्हा अनुभवणारा असतो तेव्हा काहीही नसण्याच्या प्रत्यक्ष अनुभूतीला प्रतिबंध होतो.

पोकळीच्या पलीकडे जाण्याच्या अभिलाषेने जेव्हा आपण ती प्रत्यक्ष अनुभवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अशी प्रत्यक्ष अनुभूती येतच नाही कारण अहं एका सारुप्य पावणाऱया गोष्टीच्या  रुपात असतो. जेथे अनुभवणारा असतो तेथे प्रत्यक्ष अनुभूती नसते. ‘जे आहे’ ला कोणतेही नाव न देता त्याची प्रत्यक्ष अनुभूतीच ‘जे आहे’ पासून मुक्त करते.

किशोर खैरनार,