|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कर्मचाऱयांची संख्या वाढली ; महसुलाचा आकडा जैसेथे

कर्मचाऱयांची संख्या वाढली ; महसुलाचा आकडा जैसेथे 

बेळगाव / प्रतिनिधी :

महापालिकेचा महसुल वाढीसाठी कर्मचाऱयांची संख्या वाढविण्यात आली. पण महसुल वसुलीचा आकडा वाढत नाही. मात्र कर्मचाऱयांना देण्यात येणाऱया वेतनाच्या रक्कमेत वाढ झाली आहे. कर्मचाऱयांची संख्या वाढवून काय साध्य झाले. असा मुद्दा अर्थ, कर, आणि महसुल स्थायी समिती बैठकीत उपस्थित करण्यात आला. व मालमत्ता कर वसुलीचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेच्या स्थायी समिती बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. पण अचानक ठरविण्यात आलेल्या बैठकींचा थांगपत्ता कोणालाच लागत नाही. गुरूवारी अर्थ, कर, आणि महसुल स्थायी समितीची बैठक पुंडलिक परीट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मनपाच्या महसुल वसुलीबाबत चर्चा करण्यात आली. महापालिकेकडे केवळ 32 बिल कलेक्टर होते. ती संख्या आता 48 वर पोहोचली आहे. तसेच 5 महसूल निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली वर्षाला 25 ते 30 कोटीचा मालमत्ता कर वसुल केला जात होता. पण आता 9 महसूल निरीक्षक असूनही वर्षभरात 30 कोटीचा टप्पा गाठला जात नाही. ही बाब गांभीर्याची आहे. मनपाच्या महसुलात वाढ व्हावी या उद्देशाने कर्मचाऱयांची संख्या वाढविली. पण याचा काहीच उपयोग झाला नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. इतके कर्मचारी असूनही महसुलाचा आकडा का वाढत नाही, अशी विचारणा बैठकीत करण्यात आली. निवडणूकीचे कामकाज तसेच अन्य कामे लागत असल्याने महसुल वसुलीवर परिणाम होत असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱयांनी दिली. पण ही सबब योग्य नसून यापूर्वी देखील निवडणुकीचे कामकाज लागत होते. यामुळे महसुल वसुलीसाठी कर्मचाऱयांनी व अधिकाऱयांनी प्रामाणीकपणे प्रयत्न करावे, अशी सूचना करण्यात आली.