|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आंबेनळी दुर्घटना प्रकरणी मृत बसचालकावर गुन्हा दाखल

आंबेनळी दुर्घटना प्रकरणी मृत बसचालकावर गुन्हा दाखल 

प्रतिनिधी/ दापोली

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱया आंबेनळी घाट अपघात प्रकरणी रायगड पोलिसांनी अखेर तब्बल 5 महिन्यांनी या दुर्घटनेत मृत दापोलीतील बसचालक प्रशांत भांबिड यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन गुन्हा दाखल केला आहे.

  महाबळेश्वर येथे 28 जुलै 2018 रोजी वर्षा सहलीसाठी जाणाऱया येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला होता. पोलादपूर ते महाबळेश्वरदरम्यान असणाऱया दाभिळ टोकाजवळ आंबेनळी घाटात ही बस खोल दरीत कोसळून यात 30 जणांचा मृत्यू ओढवला होता. मात्र या अपघातात याच बसमधून प्रवास करणारे त्यांचे सहकारी प्रकाश सावंत-देसाई हे आश्चर्यकारकरित्या बचावले होते. यामुळे सावंत-देसाई हे या अपघातातून बचावले असल्याने त्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तपास केला. सावंत-देसाई यांनी सांगितल्यानुसार, या बसमध्ये विद्यापीठाचे 2 चालक होते. त्यांच्यापैकी भांबिड हे अपघात झाला, तेव्हा गाडी चालवत होते. मात्र हे प्रकरण रस्ता अपघात एवढीच नेंद पोलादपूर पोलिसांनी करून 5 महिने या घटनेचा तपास केला. यानंतर त्यांनी भांबिड यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन त्यांच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल केला. या आधी सावंत-देसाई हे गाडी चालवत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी करून त्यांच्या बदलीची मागणी केली होती. त्यानुसार विद्यापीठाने त्यांची मुख्यालयातून रत्नागिरी येथे बदली केली होती.